जमाते इस्लामी हिंद महिला शाखेचा उपक्रम; प्रेम, एकता आणि समजुतीचा संदेश देणारा ईद मिलन कार्यक्रम संपन्न.
महाराष्ट्र राज्य विभागीय संपादक (रावेर / शेख शरीफ)
रावेर येथे जमाअते इस्लामी हिंद, महिला शाखा तर्फे दि. 16 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेला ईद मिलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला. महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेला हा सुंदर कार्यक्रम नगरसेवक सादिक शेख यांच्या निवासस्थानी पार पडला.
समाजात जातीय सलोखा, परस्पर प्रेम आणि बंधुभाव वाढवण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात आस्मा खान यांनी पवित्र कुरआनच्या मराठी अर्थासह पठण करून केली, ज्यामुळे कार्यक्रमाला आध्यात्मिक वातावरण लाभले.
यानंतर वाजेदा सादिक शेख यांनी प्रसिद्ध कवी सुरेश भट लिखित प्रेषित पैगंबर हजरत मोहम्मद( स अ स) यांच्यावरील मराठी नात सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या नगराध्यक्षा संगीता महाजन यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,
"आजच्या काळात समाजात प्रेम, बंधुभाव आणि एकमेकांच्या धर्माची समज वाढवण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत गरज आहे." त्यांनी जमाअते इस्लामी हिंदच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.
श्रीमती साजेदा परवीन यांनी रमजान, रोजा आणि कुरआन याविषयी मार्गदर्शन करताना सांगितले की,
"एकमेकांचे धर्म आणि विचार समजून घेतल्याने गैरसमज दूर होतात आणि समाजात एकोपा निर्माण होतो."
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर महिलांचे स्वागत करण्यात आले तसेच सर्वांना पारंपरिक शिरखुर्म्याचा आस्वाद देण्यात आला.
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा संगीता महाजन, डॉ. हर्षा दिंगबर, नगरसेविका अर्चना पाटील, अनिता तायडे, सीमा जमादार, सालेहा खान, कल्पना सावकारे, कविता अग्रवाल, रेखा चौधरी, मंगला भास्कर, शीतल पाटील, गुंजन ताई, मंजूश्री ताई, सायमा बाजी, धनश्री मॅडम आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक सानिया खलील यांनी केले, तर आभार प्रदर्शन आस्मा खान यांनी केले. अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी अशा या छोटेखानी कार्यक्रमाची सांगता आनंदी वातावरणात झाली.

