माष्टी येथील दंगलीत विद्यार्थ्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले मागे घेण्याची मागणी, १८ मे रोजी धर्माबाद बंद चा इशारा
धर्माबाद तालुका प्रतिनिधी गजानन वाघमारे
तालुक्यातील मौ. माष्टी येथे बौद्ध वस्तीवर सवर्णांनी भ्याड हल्ला करून,घरात घुसून पुरुष व महिला व लहान मुला -मुलींना बेदम मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले आहेत. बौद्धांचे काही विद्यार्थी बाहेरगावी शिक्षणास असताना, त्यांच्यावरही आकस बुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी वंचित बहुजन आघाडी व भारतीय बौद्ध महासभा व विविध संघटनेचे कार्यकर्त्यांनी मागणी केलेली असून दि.१८ मे रोजी धर्माबाद बंद असा इशारा दिला आहे. शिष्टमंडळाने धर्माबाद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
याबाबत थोडक्यात वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील मौ. माष्टी येथे पहिल्यांदाच भीम जयंती साजरी केल्याचा राग धरून दि. आठ मे २०२६ रोजी सायंकाळी शुल्लक कारणावरून सवर्णांनी बौद्ध वाड्यात घुसून लाथाबुक्क्यांनी ,काठ्या, व राड ने मारहाण केल्याने अनेक बौद्ध बांधव गंभीर जखमी झाले होते. त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठविण्यात आले होते.
या दंगली नंतर कुंडलवाडी येथील पोलीस स्टेशनमध्ये, नऊ घरे असलेल्या बौध्द वाड्यातील १६ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर सवर्णाचे १७ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या वेळी उपस्थित नसलेल्या लोकांवर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पैकी बालाजी पिराजी सोनकांबळे व सुनील पिराजी सोनकांबळे हे दोघे नांदेड येथील अभ्यासिकेत अभ्यास करीत होते याचे सी सी टिव्ही फुटेज उपलब्ध आहेत. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुड बुध्दी ने गुन्हा दाखल करण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
माष्टी या गावास भिम टायगर सेनेचे अध्यक्ष दादासाहेब शेळके, रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष अनिल सिरसे, आंबेडकरी चळवळीचे नेते सुरेश दादा गायकवाड यांनी भेट दिली आहे.
धर्माबाद तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष एकनाथ जिंकले व बौ..म.सभेचे ता.अध्यक्ष कैलास डुमणे यांनी दि.१५ मे २०२६ रोजी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन उप विभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील यांना लेखी निवेदन देऊन विद्यार्थ्यांवरील खोटे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.गुन्हे मागे नाही घेतल्यास दि.१८ मे २०२६ रोजी धर्माबाद बंद करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर वंचित चे महासचिव गौतम देवके, सल्लागार जे.के.जोंधळे,जी.पी.मिसाळे (माजी जिल्हा उपाध्यक्ष भारिप बहुजन महासंघ), सुधाकर जाधव माजी नगरसेवक, सुभाष कांबळे जिल्हा संघटक भा.बौ.म.नांदेड, सुदर्शन वाघमारे ता.अध्यक्ष मराठी पत्रकार संघ,गंगाधर धडेकर माजी ता.अध्यक्ष,सदानंद देवके माजी अध्यक्ष भा.बौ.म.स.,चांदोबा वाघमारे ता.संघटक, लक्ष्मण तुरेराव सा.कार्यकर्ता,शहराध्यक्ष कपील वाघमारे,चंद्रभिम हौजेकर सा.कार्यकर्ता, रोहित रामटक्के,बालाजी घायाळ, किशोर बनसोडे अनेक कार्यकर्ते यांची स्वाक्षरी आहे.

