*“सालार नगरच्या स्पर्धा परीक्षा केंद्राची दमदार कामगिरी!”*
*इनामुल पटेल आणि नाजिम शेख यांची महाराष्ट्र सिक्योरिटी फोर्समध्ये भरती*
(रावेर शेख शरीफ)
जळगाव येथील सालार नगर परिसरातील स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राने पुन्हा एकदा यशाचा झेंडा रोवला असून केंद्रातील दोन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र सिक्योरिटी फोर्स (MSF) मध्ये यशस्वी भरती मिळवून परिसराचे नाव उज्ज्वल केले आहे. इनामुल पटेल आणि नाजिम शेख या विद्यार्थ्यांच्या यशामुळे केंद्रात तसेच त्यांच्या कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशामागे स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राचे संचालक व मार्गदर्शक रागिब अहमद यांचे विशेष योगदान राहिले. त्यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन, टेस्ट सिरीज आणि अभ्यासाचे नियोजन करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये आत्मविश्वासाने यश मिळवता आले.
या यशाबद्दल केंद्राचे अध्यक्ष हाजी अल्ताफ शेख, उपाध्यक्ष मुफ्ती अतिकुर रहमान, सैयद इसाक, सैयद मुसरत अली, निसार शेख, इमरान खान, रईस जागीरदार आणि डॉ. सैय्यद हनीफ यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी रागिब अहमद यांनी बोलताना सांगितले की, “युवकांनी मेहनत आणि योग्य दिशेने अभ्यास केल्यास यश नक्की मिळते. केंद्र भविष्यातही विद्यार्थ्यांना नोकरी-केंद्रित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देत राहील.”
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरातील इतर युवकांमध्येही स्पर्धा परीक्षांविषयी उत्साह निर्माण झाला असून केंद्राने पुढील बॅचसाठी नवीन सत्र लवकरच सुरू करण्याची घोषणा केली आहे.

