आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कामे तातडीने पुर्ण करा

आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित सर्व कामे तातडीने पुर्ण करा
==================                                   - जिल्हाधिकारी वान्मथी सी
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सुन पुर्वतयारी बैठक

वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा 

वर्धा, दि.१२/५/२०२६: मान्सुन काळात वेगवेगळ्या प्रकारचे आपत्कालीन प्रसंग उद्भवण्याची शक्यता असते. अशा संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागांनी पुर्व तयारी करणे आवश्यक आहे. विभागांकडे याबाबत सोपविलेली कामे मे महिना अखेरपर्यंत पुर्ण करावीत. आपला स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी दिले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सुन पुर्व तयारी आढावा बैठक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह अप्पर जिल्हाधिकारी संजय तेली, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपजिल्हाधिकारी प्रताप वाघमारे, राजु रणवीर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शुभम घोरपडे यांच्यासह सर्व विभाग प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पुरस्थिती उद्भवल्यास बचाव पथके व साहित्याची तातडीने आवश्यकता भासते. त्यामुळे पथकातील मनुष्यबळाचे प्रशिक्षण, साहित्याची सुस्थिती याबाबी आताच तपासून घेणे आवश्यक आहे. तहसिलदारांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन संबंधितांना स्पष्ट सूचना द्याव्यात. पावसाळ्यात नदी काठावरील काही भागात वारंवार पाणी साचण्याच्या जागा असतात. अशा ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्या जाव्या. शहरे गावांमधील नाल्यांची सफाई, स्वच्छता करण्यात यावी, असे निर्देश दिले.
विभागांनी आपले आपत्ती व्यवस्थापन आराखडे २० मे पर्यंत आपत्ती व्यवस्थापन कक्षास सादर करावे तसेच विभागांतर्गत तालुका आणि गावपातळीवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. आपत्तीकाळात संवादासाठी एका अधिकाऱ्यास नोडल अधिकारी म्हणून नेमावे. दिनांक १ जून पासून नियंत्रण कक्ष सुरु करावे. शोध व बचाव साहित्यांची प्रत्यक्ष तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिऱ्यांनी दिल्या.
पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास ग्रामीण भागात रोगांच्या साथी पसरण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने पुरेसा औषधी साठा, ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या विहीरींमधीस पाणी दुषित होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना, तीन महिने पुरतील इतका अन्नधान्याचा साठा उपलब्ध ठेवण्यात यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
मान्सून काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी ज्या विभागांचा महत्वाचा सहभाग असतो, अशा सर्व विभागांना जबाबदारीची वाटप करण्यात आले असून त्यांनी त्याप्रमाणे कामे वेळेत पुर्ण करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस, कृषी, पुरवठा, आरोग्य, जलसंपदा, नगरपालिका, बांधकाम, परिवहन महामंडळ, वीज वितरण कंपनी, परिवहन विभाग, शिक्षण, पशुसंवर्धन यासह सर्व संबंधित विभागाकडून त्यांच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
बैठकीला सर्व विभाग प्रमुख अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसिलदार, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका कृषि अधिकारी उपस्थित होते. मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
Previous Post Next Post