परभणी एल.सी.बी. कडून जालना जिल्ह्यातून दोन चोरटे गजाआड*

*परभणी एल.सी.बी. कडून जालना जिल्ह्यातून दोन चोरटे गजाआड*

मानवत परभणी जिल्हा विभागीय संपादक/ अनिल चव्हाण

———————————
अडीच लाखांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त
स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
सेलू शहरातील गणपती गल्ली परिसरातून एका महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पसार झालेल्या दोन अट्टल गून्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एल.सी.बी.) पथकाने अवघ्या काही तासांत जालना जिल्ह्या मधील परतूर येथून बेड्या ठोकल्या. आरोपींकडून चोरीला गेलेले सोन्याचे गंठण आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक १६ मे रोजी फिर्यादी स्नेहल स्वप्निल भरदम (रा. गणपती गल्ली, सेलू) या आपल्या स्कूटी वरून लक्ष्मी मॉल येथे खरेदीसाठी गेल्या होत्या.मॉल च्या समोर पोहोचल्या असता, मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजार रुपये किमतीचे दीड तोळा वजनाचे सोन्याचे गंठण जबरदस्तीने हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महिला ना टार्गेट केल्याने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून परभणीचे पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तात्काळ तपास सुरू केला.
सीसीटीव्ही फुटेज आणि वर्णनावरून आरोपी निष्पन्न झाला असून तपास पथकाने घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीने दिलेल्या वर्णनाच्या आधारे संशयितांची माहिती काढली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून हे चोरटे जालना जिल्ह्यातील परतूर येथील असल्याची खात्री पटली.
एलसीबीच्या पथकाने तातडीने परतूर येथील पारधी वाडा परिसरात छापा टाकून खोबराजी शिवाजी काळे आणि त्याचा साथीदार अर्जुन रजनी चव्हाण (दोन्ही रा. पारधी वाडा, परतूर, जि. जालना) या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सेलूतील चोरीची कबुली दिली. आरोपींकडून गुन्ह्यातील ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण आणि गुन्ह्यात वापरलेली युनिकॉर्न मोटारसायकल असा एकूण २ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील कारवाईसाठी सेलू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.सदरची धडाकेबाज कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस अंमलदार विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, सिद्धेश्वर चाटे, रणजीत आगळे, राम पोळ, विष्णू चव्हाण, नामदेव डुब्बे, कश्यप साने, बालाजी रेड्डी आणि गणेश कोटकर यांच्या पथकाने केली आहे. एलसीबीच्या या गतिमान कामगिरी बद्दल नागरिकांमधून पोलिस प्रशासनाचे कौतुक होत आहे.


***
Previous Post Next Post