*पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर*
(मुंबई) जिल्हा विभागीय संपादक
मुंबई, दि. १३ मे — पश्चिम आशियामध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने इंधन बचत, परकीय चलन संवर्धन व नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर यासाठी विविध महत्त्वाच्या उपाययोजना जाहीर केल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात शासन परिपत्रक जारी केले असून सर्व शासकीय विभाग, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. �
शासनाच्या सूचनांनुसार अनावश्यक परदेश दौरे टाळण्याचे निर्देश देण्यात आले असून नव्या दौऱ्यांचे नियोजन न करण्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रो, लोकल व बसचा वापर करावा तसेच एकत्रित प्रवासासाठी Carpooling ला प्राधान्य द्यावे, असे नमूद करण्यात आले आहे.
राज्यातील मंत्रालयीन, विभागीय व जिल्हास्तरीय बैठका, प्रशिक्षण व चर्चासत्रे ऑनलाइन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यावर भर देण्यात आला आहे. विद्यापीठे व महाविद्यालयांनाही या पद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच Work From Home पद्धतीला प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. �
पोलीस विभागाला कोणत्याही कारणासाठी Bike Rally, वाहन मिरवणुका किंवा वाहन ताफ्यांना परवानगी न देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय अनावश्यक विद्युत वापर टाळणे, कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर वाढविणे तसेच सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यावर शासनाने भर दिला आहे. �
खाद्यतेलाचा वापर कमी करण्यासाठी कॅन्टीन, अंगणवाडी, वसतिगृहे, रुग्णालये व पोलीस भोजनालयांमध्ये मेन्यू बदलण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाम, सोयाबीन व सूर्यफूल तेलाऐवजी मोहरी व शेंगदाणा तेल वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक, जैविक व सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. �
दरम्यान, राज्य शासनाने सर्व प्रशासकीय विभाग, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. �

