वर्ध्यात दारू माफियांवर एलसीबीची धडक कारवाई; दोन वाहनांसह 19.82 लाखांचा मुद्देमाल जप्त
मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक
वर्धा जिल्ह्यात अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत दोन स्वतंत्र छाप्यांमध्ये तब्बल 19 लाख 82 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांनी संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री व वाहतुकीविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत दि. 15 जून 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे सेलू पोलीस ठाणे हद्दीतील दंढारे टी-पॉईंट परिसरात सापळा रचून स्कॉर्पिओ वाहन क्रमांक एमएच-46-एएल-5664 ची तपासणी केली.
तपासणीदरम्यान तेजस राजेंद्र मांढरे व प्रणय मारुती डुकरे (दोघे रा. सेलू) हे मोठ्या प्रमाणात विदेशी दारू व बिअरची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्या ताब्यातून 30 खोक्यांमधील विदेशी दारू, एक खोका बिअर तसेच स्कॉर्पिओ वाहन असा एकूण 17 लाख 12 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यानंतर करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत सुलभ ज्ञानेश्वर डायगव्हाणे (वय 30, रा. वाहितपूर, वार्ड क्र. 3, सेलू) हा अल्टो कार क्रमांक एमएच-32-सी-0860 मधून देशी दारूच्या 200 शिशांची वाहतूक करताना आढळून आला. त्याच्याकडून अल्टो कारसह 2 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांमध्ये मिळून एकूण 19 लाख 82 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल व अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पार पडली. या मोहिमेत पोलीस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित व अभिषेक नाईक यांनी सक्रिय सहभाग घेत कारवाई यशस्वी केली.
अवैध दारू तस्करीविरोधातील या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील दारू माफियांना मोठा दणका बसला असून अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

