क्रांती विकासाची झाली, पण नाती हरवली !
तंत्रज्ञानाच्या युगात माणूस जवळ आला, मात्र मनं दूर गेली
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर नांदेड
देगलूर:आजच्या आधुनिक युगात विज्ञान, तंत्रज्ञान आणि विकासाने अभूतपूर्व प्रगती केली आहे. मोबाईल, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑनलाइन व्यवहार, जलद वाहतूक व्यवस्था यामुळे जग अक्षरशः एका क्लिकवर आले आहे. माणसाचे जीवन अधिक सोयीस्कर, वेगवान आणि आरामदायी झाले आहे. मात्र या विकासाच्या शर्यतीत माणूसपण, प्रेम, जिव्हाळा आणि नातेसंबंध कुठेतरी हरवताना दिसत आहेत.
एकेकाळी सण-उत्सव म्हणजे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येण्याचा आनंद असायचा. दिवाळी, दसरा, संक्रांत, होळी किंवा इतर कोणताही सण असो, घराघरांत उत्साहाचे वातावरण असायचे. अंगणात हास्याचे फवारे उडायचे, गप्पांची मैफिल
रंगायची. आज मात्र अनेक ठिकाणी सण फक्त सोशल मीडियावरील शुभेच्छांच्या संदेशांपुरतेच मर्यादित राहिले आहेत.पूर्वी नात्यांमध्ये आपुलकी, विश्वास आणि त्याग होता. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याची भावना होती. आज मात्र व्यस्त जीवनशैली, स्पर्धा आणि स्वार्थी विचारसरणीमुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे. शेजारी शेजा-याला ओळखत नाही,क्रांती विकासाची झाली, पण नाती हरवली.तंत्रज्ञानाच्या युगात माणूस जवळ आला, मात्र मनं दूर गेली.नातेवाईकांमध्ये संवाद कमी झाला आहे, तर अनेक कुटुंबांमध्ये एकत्र बसून जेवण करण्याची परंपराही लोप पावत चालली आहे.तंत्रज्ञानाने जग जवळ आणले असले तरी मनांमधील अंतर वाढले आहे. मोबाईलवरील हजारो मित्र असूनही प्रत्यक्ष आयुष्यात माणूस एकाकी होत चालल्याचे चित्र दिसते. पैशाच्या आणि यशाच्या मागे धावताना अनेक जण नात्यांचे महत्त्त्व विसरत आहेत.समाजातील ज्येष्ठ नागरिकांचे मत आहे की, विकास आवश्यक आहे; परंतु त्याचबरोबर संस्कार, प्रेम, जिव्हाळा आणि मानवी मूल्ये टिकवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. कारण कोणतीही प्रगती माणसाला सुखी करू शकत नाही, जर त्याच्या आयुष्यात प्रेमाची ऊब आणि नात्यांचा आधार नसेल.
आज गरज आहे ती केवळ तंत्रज्ञानाच्या विकासाची नव्हे, तर माणुसकीच्या पुनजीगरणाची. सण-उत्सव पुन्हा आनंदाने साजरे करण्याची, नात्यांना वेळ देण्याची आणि प्रेम, आपुलकी जपण्याची. कारण विकास माणसाचे जीवन सोपे करू शकतो, पण प्रेम आणि नातीच जीवन सुंदर बनवतात. 'मोबाईलच्या स्क्रीनवर जग सापडले, पण माणसांच्या मनातली जागा हरवली', अशी भावना आज अनेकांच्या मनात उमटताना दिसत आहे.

