लांजी ग्रा.पं. कार्यालायत फार्मर कप 2026 उपक्रमाचा शुभारंभ
◼️शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
माहूर : तालुका प्रतिनिधी शेख रफिक गाईड माहूरगड
माहूर तालुक्यातील लांजी ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी दि. 29 जून ‘फार्मर कप 2026′ स्पर्धेचा डिजिटल शुभारंभ उत्साहात पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या राज्यस्तरीय उद्घाटन सोहळ्याचे थेट प्रक्षेपण लांजी ग्रामपंचायत कार्यालयात दाखविण्यात आले. या कार्यक्रमाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमात शेतकरी गटांच्या माध्यमातून शेतीतील नवकल्पना, उत्पादकता वाढ, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक सहभागाचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्पर्धेची उद्दिष्टे, नोंदणी प्रक्रिया आणि सहभागाचे निकष याबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या कार्यक्रम प्रसंगी पोखर्णी नांदेड येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ देवकांत देशमुख यांनी शेतकरी बांधवाना मार्गदर्शन केले.यावेळी तालुका कृषी अधिकारी ए.एम. एलपलवाड, लांजी चे सरपंच मारोती रेकुलवार, कृषी पर्यवेक्षक विनोद कदम, अमित पवार, पाणी फाउंडेशन चे सतीश भिसे, कृषी पर्यवेक्षक सुधीर राजूरकर, आत्मा तालुका तंत्र व्यवस्थापक महेश तहाडे, समूह सहा. दवणे, कानिंदे, समन्वयक नितेश बनसोडे आदी सह कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना एकत्रितपणे स्पर्धेत सहभागी होऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. ‘एकत्रित प्रयत्न, सक्षम शेतकरी फार्मर कप 2026 यशस्वी करूया.असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

