शहादा भूमी अभिलेख कार्यालय 'रामभरोसे' : उपअधीक्षकच गायब, शेकडो शेतकऱ्यांचे अर्ज धुळखात, प्रशासनाचा ढिसाळ कारभार
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक )
शहादा :
शहादा येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार सध्या पूर्णपणे 'रामभरोसे' सुरू असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. कार्यालयाचे प्रमुख उपअधीक्षक गेल्या अनेक दिवसांपासून गैरहजर असल्याने शासकीय कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. याचा थेट फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसत असून, हेलपाटे मारूनही कामे होत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
*साहेबच खुर्चीवर नाहीत, कर्मचाऱ्यांवर वचक नाही*
कार्यालयात मुख्य अधिकारीच जागेवर नसल्याने इतर कर्मचाऱ्यांवर कोणाचेही नियंत्रण उरलेले नाही. नियमाप्रमाणे जमीन मोजणीचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर ठराविक मुदतीत सर्व्हेअरने मोजणी करणे बंधनकारक आहे. मात्र, उपअधीक्षकांच्या अनुपस्थितीमुळे मोजणीचे शेकडो अर्ज कार्यालयात धूळ खात पडून आहेत. वेळेत मोजणी न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.
*वादग्रस्त प्रकरणे प्रलंबित, जिल्हा पातळीवरूनही दुर्लक्ष*
जमिनीशी संबंधित अनेक गुंतागुंतीची प्रकरणे व वाद उपअधीक्षकांअभावी महिनोन्महिने प्रलंबित आहेत. या गंभीर समस्येबाबत त्रस्त नागरिक व विविध संघटनांनी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या होत्या. मात्र, जिल्हा पातळीवरून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
*नाशिक उपसंचालकांनी लक्ष घालण्याची मागणी*
शहादा भूमी अभिलेख कार्यालयाची ही दुरवस्था थांबवण्यासाठी आता नाशिक येथील भूमी अभिलेखा विभागाचे उपसंचालक यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कार्यालयाला कायमस्वरूपी व तत्पर उपअधीक्षक मिळाल्यास रखडलेली शेकडो कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.
शासकीय नियम फक्त कागदावरच उरले असून, अधिकारी गायब असल्याने जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. आता वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

