*शहादा विधानसभा मतदारसंघात विशेष मतदार पुनरीक्षण कार्यक्रम सुरू; 5 ऑगस्टला प्रारूप यादी प्रसिद्ध होणार..*
नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील
शहादा : 02 शहादा विधानसभा मतदारसंघात भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे, अशी माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दीपक गिरासे यांनी दिली. यावेळी सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार संभाजी पाटील उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचा पहिला टप्पा 20 जूनपासून सुरू झाला असून दुसरा टप्पा 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत राबविला जाणार आहे. 5 ऑगस्ट 2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर 5 ऑगस्ट ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत मतदारांविषयी तक्रारी स्वीकारल्या जातील. आवश्यक प्रकरणांमध्ये संबंधितांना नोटीस देऊन सुनावणी घेतली जाईल व 7 ऑक्टोबर 2026 पर्यंत प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय घेतला जाईल.
शहादा विधानसभा मतदारसंघात एकूण 366 मतदान केंद्रे असून त्यापैकी शहादा तालुक्यात 227 आणि तळोदा तालुक्यात 139 केंद्रांचा समावेश आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 366 बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक BLO किमान तीन वेळा घरोघरी भेट देणार आहे. यावर देखरेख ठेवण्यासाठी 27 पर्यवेक्षीय अधिकारी, शहादा येथे 18 व तळोदा येथे 9, नियुक्त केले आहेत.
मतदार यादी अचूक, अद्ययावत व सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी BLO यांना आवश्यक माहिती व कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत आणि या पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी दीपक गिरासे तसेच सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, शहादा व तळोदा यांनी केले आहे.

