कडक उन्हात पातूर नगर परिषद निवडणुकीला सुरुवात; ५:३० वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान
(पातुर अकोला विशेष तालुका प्रतिनिधी दुल्हे खान)
पातूर, दि. २० जून : पातूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी शनिवारी सकाळपासून मतदान प्रक्रियेला शांततेत सुरुवात झाली.या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाकरिता एकूण पाच उमेदवार रिंगणात होते,तर नगरसेवक पदाच्या २० जागेकरिता एकूण ७५ उमेदवार लढतीत होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली असून मतदान केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
कडक ऊन आणि उष्णतेची तीव्रता असतानाही पातूरकर मतदारांमध्ये मतदानाबाबत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रांवर हजेरी लावली. आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विजय मिळवून देण्यासाठी मतदार केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.
निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी एसडीपीओ तसेच पातूरचे तहसीलदार यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
सकाळपासून दुपारपर्यंत कडक उन्हामुळे मतदान केंद्रांवरील मतदारांची वर्दळ तुलनेने कमी होती. उपलब्ध माहितीनुसार दुपारी १ वाजेपर्यंत एकूण ३७ टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारनंतर हवामानात बदल होऊन तापमानात काहीशी घट होताच मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांकडे मोर्चा वळवला. त्यानंतर अनेक मतदान केंद्रांवर मोठी गर्दी झाल्याचे दिसून आले.
निवडणुकीच्या निकालाबाबत शहरात उत्सुकतेचे वातावरण असून सर्व उमेदवारांचे समर्थक मतदानाचा टक्का वाढावा यासाठी मतदारांशी संपर्क साधताना दिसून आले. दरम्यान, शांततापूर्ण आणि निष्पक्ष मतदानासाठी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट ठेवली आहे. 5:30 ला अंदाज़ित 72% से 74% टके मतदान झाले होते.
चौकट :
पातूर नगर परिषदेच्या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता विकास योद्धा मंच-वंचित बहुजन आघाडी व एमआयएम युतीचे हाजी सै. बुऱ्हाण सै. नबी,काँग्रेस-शिवसेना(उबाठा) युतीचे हिदायत खान रूम खान,भाजपा चे सचिन ढोणे,शिवसेना (शिंदे गट) चे सुभाष बोचरे,तर सलाबत खान हाफिजउल्ला खान अपक्ष असे एकूण ५ उभे होते.
यापैकी अध्यक्ष उमेदवारांमध्ये विकास योद्धा मंच-भाजपा व काँग्रेस मध्ये तिरंगी लढत झाली असून नगराध्यक्ष पदावर कोण बाजी मारते याची उत्सुकता पातूरकरांना लागली आहे.

