रावेर आयटीआयमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न; डॉ. योगिता पाटील यांचे प्रतिपादन
(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे )
रावेर:येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रावेर येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ तथा माऊली हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. योगिता संदीप पाटील उपस्थित होत्या.या सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याचे स्मरण करण्यात आले. शिवरायांचा न्यायप्रिय राज्यकारभार, सुशासन आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांचे योगदान यावर उपस्थित वक्त्यांनी प्रकाश टाकला. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. योगिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचे आवाहन केले. राष्ट्रहित, समाजसेवा आणि कर्तव्यनिष्ठा हीच आजच्या काळातील खरी शिवभक्ती असल्याचे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात पटवून दिले.शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, प्रशिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. उपस्थित सर्वांनीच या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

