देगलूरमध्ये स्वच्छता अभियानास प्रतिसाद.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर: स्वच्छता ही सेवा आणि सामाजिक जबाबदारी या भावनेतून देगलूर शहरात शुक्रवारी न्यायालय परिसरासह विविध सार्वजनिक ठिकाणी महास्वच्छता अभियान उत्साहात राबविण्यात आले. माननीय न्यायाधीश रवींद्र राठोड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या महास्वच्छता अभियानाचे संयोजन देगलूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी केले. कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी अनुप पाटील, तहसीलदार भारत सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड, नगर परिषदेचे उपाध्यक्ष अॅड. अंकुश देसाई देगावकर, गटविकास अधिकारी श्रीकांत बळदे तसेच अभिवक्ता संघाचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियानांतर्गत न्यायालय परिसराची विशेष स्वच्छता करण्यात आली. तसेच शहरातील प्रमुख ठिकाणे असलेल्या गांधी चौक आणि अण्णाभाऊ साठे चौक येथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, नगर परिषद कर्मचारी, देगलूर महाविद्यालयाचे एनसीसी पथक, अभिवक्ते आणि नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदविला.समारोप प्रसंगी मुख्याधिकारी नीलम कांबळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना कचरा व्यवस्थापन ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले. त्यांनी (कमी वापर), (पुनर्वापर) आणि (पुनर्चक्रण) या
संकल्पनांचे महत्त्व विशद केले. दैनंदिन जीवनात या तत्त्वांचा अवलंब केल्यास कचऱ्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी नागरिकांनी स्वच्छतेच्या नियमांचे पालन करून नगर परिषदेच्या उपक्रमांना सक्रिय सहकार्य करावे, असेआवाहनही त्यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वच्छता ही केवळ मोहीम नसून प्रत्येक नागरिकाची दैनंदिन जबाबदारी असल्याचे सांगत शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी सातत्याने सहकार्य करण्याचे आवाहन केले. महास्वच्छता अभियानाचा समारोप देगलूर नगर परिषद कार्यालयात करण्यात आला. या उपक्रमामुळे शहरात स्वच्छतेबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश पोहोचला.

