*बार्शिटाकली नगर पंचायतीचा मनमानी कारभार: इंदिरा नगरमधील जनता स्वतःच नाले उपसण्यास मजबूर, प्रशासन सुस्त*
*अकोला जिल्हा प्रतिनिधी इमरान खान*
बार्शिटाकली:अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकली नगर पंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्रमांक १६, इंदिरा नगर येथील स्वच्छता व्यवस्था पूर्णपणे रामभरोसे असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक प्रशासनाच्या तीव्र निष्काळजीपणामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यांमधील सडणारे पाणी आणि दुर्गंधीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अखेर प्रशासनाची वाट न पाहता स्वतःच हातात फावडे आणि झाडू घेऊन नालेसफाई सुरू केली आहे. आम्ही दरवर्षी नियमित कर भरूनही आम्हाला अशा नरकयातना का सोसाव्या लागत आहेत, असा संतप्त सवाल स्थानिक करदात्या नागरिकांनी उपस्थित केला आहे.रोगराईचा धोका वाढला; प्रशासनाचे डोळे झाकइंदिरा नगरवासीयांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉर्डात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्यांचे पाणी रस्त्यावर येत आहे. यामुळे परिसरात मलेरिया, डेंग्यू यांसारख्या घातक आजारांची साथ पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येबाबत नगर पंचायत प्रशासनाला अनेकदा लेखी आणि तोंडी तक्रारी देण्यात आल्या. मात्र, ढिम्म प्रशासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. वॉर्डात एकही सफाई कर्मचारी फिरकत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.*

