*भद्रावतीत मुंढें पॅटर्नचा धसका !...*
*जनतेला दिलासा, मात्र व्यावसायिकांची चिंता*
सर्वाधिक गुटखा व पान टपऱ्या पडल्या ओस.
महेश निमसटकर
भद्रावती चंद्रपूर जिल्हा विभागीय संपादक
भद्रावती, दि.19:- सध्या संपूर्ण राज्यभरात अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज आणि कडक कारवायांमुळे भेसळयुक्त आणि नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याचे थेट पडसाद भद्रावती परिसरात उमटू लागले आहेत. प्रचंड लोकसंख्या आणि कामगार वर्ग असलेल्या या क्षेत्रात एफडीएशी संबंधित शेकडो छोटे-मोठे व्यवसाय, हॉटेल्स, टपऱ्या आणि अन्नपदार्थ विक्रेते आहेत.
आयुक्त मुंढे यांच्या या मोहिमेचे सर्वसामान्य नागरिकांमधून जोरदार कौतुक होत असले, तरी या कडक नियमांमुळे जर स्थानिक छोटे व्यवसाय बंद पडले, तर त्याचे काय परिणाम होतील, यावर आता दोन्ही बाजूंनी उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.या संवेदनशील विषयाचा घेतलेला हा एक विशेष आढावा म्हणजे त्याची एक बाजू बघितली तर नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षा आणि कायद्याचा वचक याबद्दल सकारात्मक दिसत आहे.तुकाराम मुंढे यांच्या निर्णयांचे सर्वदूर स्वागत होत आहे, कारण हा थेट जनतेच्या आरोग्याशी जोडलेला विषय आहे.भद्रावती परिसरात शेकडो कामगार रोज बाहेरचे अन्न खातात. एफडीएच्या कडक कारवाईमुळे हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांचा दर्जा सुधारेल आणि नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित अन्न मिळेल.
विशेष म्हणजे नफा कमवण्यासाठी लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या घटकांवर वचक निर्माण होईल.दूषित आणि निकृष्ट अन्नामुळे होणारे आजार टळल्यास कामगार आणि सर्वसामान्यांचा वैद्यकीय खर्च वाचेल, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढेल.आणि दुसरी बाजू अशी की दुसरीकडे, कायद्याचा बडगा एवढा तीव्र आहे की, नियमांची जुजबी माहिती नसलेले छोटे व्यावसायिक धास्तावले आहेत. जर या कारवायांमुळे येथील छोटे व्यवसाय बंद पडले, तर त्याचे गंभीर सामाजिक व आर्थिक परिणाम होऊ शकतात हजारो कुटुंबांची उपजीविका गुटखा,चहाच्या टपऱ्या, छोटे खानावळी, नाश्त्या चे ठेले आणि किराणा दुकानांवर अवलंबून आहे.
विशेषतः जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरलेला भद्रावती चा अवैध गुटखा व्यवसाय बंद झाल्यास हे लोक थेट बेरोजगार होतील.
भद्रावती परिसरात आयुध निर्माणि, कोळशा खाणी, इथे बरेच कामगार आहेत,स्थानिक कामगारांना स्वस्त दरात जेवण-नाश्ता देणारे हेच छोटे व्यावसायिक आहेत. हे पर्याय बंद झाल्यास कामगारांच्या खाण्यापिण्याची आबाळ होईल.
लहान व्यवसायांची साखळी बंद पडल्यास भाजीपाला विक्रेते, दूध उत्पादक आणि स्थानिक पुरवठादार यांचेही नुकसान होईल, ज्यामुळे बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल मंदावू शकते.
---- बॉक्स ----
*नागरिकांचे आणि व्यावसायिकांचे मत*
नागरिक म्हणतात "आरोग्यापेक्षा मोठे काहीच नाही. प्रशासनाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असून यामुळे आम्हाला स्वच्छ अन्न मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे."तर दुसरीकडे व्यावसायिक आपले गाऱ्हाणे मांडतात की "आम्ही कारवाईच्या विरोधात नाही, पण आम्हाला सुधारण्यासाठी वेळ आणि योग्य मार्गदर्शन मिळायला हवे. अचानक व्यवसाय बंद झाला तर आम्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा?"
----- बॉक्स ----
*सुवर्णमध्य साधण्याची गरज*
अन्न व औषध प्रशासनाची ही मोहीम जनतेच्या हिताचीच आहे यात शंका नाही. मात्र, भद्रावती सारख्या कामगार बहुल क्षेत्राचा विचार करता, प्रशासनाने केवळ 'दंडात्मक कारवाई' न करता, छोट्या व्यावसायिकांना अन्न सुरक्षेच्या नियमांचे प्रशिक्षण व परवाने मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणी पुढे येत आहे.आरोग्यही टिकले पाहिजे आणि गरिबाची चूलही पेटती राहिली पाहिजे, तरच या धडाकेबाज मोहिमेचे उद्दिष्ट खऱ्या अर्थाने यशस्वी होईल, यात शंका नाही.

