नागपूर गणेशपेठ बसस्थानकावर हप्ता वसुलीचा सुळसुळाट; हॉकर्सनी केला 'शंकर सोनी'च्या विरोधात एल्गार

नागपूर गणेशपेठ बसस्थानकावर हप्ता वसुलीचा सुळसुळाट; हॉकर्सनी केला 'शंकर सोनी'च्या विरोधात एल्गार

(नागपुर जिल्हा - विपिन पाटील)

गणेशपेठ बसस्थानकावर आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी दूरवरून येऊन छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सना सध्या एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. बसस्थानकावरील सुरक्षा विभागाचे प्रमुख (इन्चार्ज) शंकर सोनी हे आपल्या अधिकाराचा गैरवापर करून हॉकर्सकडून सक्तीने हप्ता वसुली करत असल्याचा गंभीर आरोप हॉकर्स युनियनने केला आहे.
नेमका प्रकार काय?
बसस्थानकावर चणे-शेंगदाणे, एअरफोन, चार्जर, पाण्याची बाटली आणि ज्यूस यांसारख्या वस्तूंची विक्री करणाऱ्या गोरगरीब फेरीवाल्यांना शंकर सोनी यांच्याकडून त्रास दिला जात आहे. जोपर्यंत हप्ता दिला जात नाही, तोपर्यंत त्यांना बसस्थानक परिसरात व्यवसाय करू दिला जात नसल्याचा आरोप होत आहे. आतापर्यंत अनेक फेरीवाल्यांकडून ५०० ते १००० रुपयांपर्यंतची रक्कम बळजबरीने उकळली गेली असून, पैसे न दिल्यास त्यांना धमकावले जात आहे.
*हॉकर्स युनियनचा आक्रमक पवित्रा*
गेल्या काही काळापासून प्रशासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने हॉकर्सचे धाडस वाढले आहे. आमच्या मेहनतीच्या कमाईवर डल्ला मारणाऱ्या शंकर सोनींवर त्वरित कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी हॉकर्स युनियनने केली आहे.
युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, "जर प्रशासनाने या भ्रष्ट अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. एकतर आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा पोलिसांत जाऊन या वसुलीखोराच्या विरोधात गुन्हा दाखल करू. आमच्या हक्काची भाकरी हिरावून घेणाऱ्यांना आम्ही गप्प बसू देणार नाही."
प्रशासनावर प्रश्नचिन्ह
एकीकडे सर्वसामान्य नागरिक आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बसस्थानकावर प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत, तर दुसरीकडे सुरक्षेची जबाबदारी असलेला अधिकारीच वसुलीत गुंतला असल्याने एसटी महामंडळाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आता एसटी प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post