लोणी-भूतनीहिप्परगा-मुक्रमाबाद ऐतिहासिक पाऊलवाट बंद.
खरीप हंगामात शेतकरी संकटात, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
पिंजारी माहेमूद
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर : खरीप हंगामाची सुरुवात होत असताना लोणी शिवारातील शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. लोणी-भूतनीहिप्परगा मार्गावरील पिढ्यानपिढ्या वापरात असलेली ऐतिहासिक पाऊलवाट आणि पानंद रस्त्यांवर काही व्यक्तींनी कालवे खोदून, दगड टाकून तसेच विविध अडथळे निर्माण केल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात जाण्याचे मार्ग बंद झाले असून खरीप पेरणीच्या तोंडावर शेतीची कामे ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थांच्या मते, हा मार्ग केवळ पाऊलवाट नसून लोणी, भूतनीहिप्परगा आणि आंध्र प्रदेश सीमाभागाला जोडणारा ऐतिहासिक दुवा आहे. काही दशकांपूर्वी शेतकरी बैलगाडी, गाढवे व इतर जनावरांच्या सहाय्याने याच मागार्ने मुक्रमाबाद बाजारपेठेत शेतमाल विक्रीसाठी जात असत. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या गेलेल्या या वाटेवर आज अतिक्रमणाचे सावट निर्माण झाल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या खरीप पेरणीची लगबग सुरू असताना शेतकऱ्यांना बियाणे, खते, औषधे, अवजारे आणि यंत्रसामग्री शेतात पोहोचवण्यासाठी रस्त्यांची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र अनेक ठिकाणी मार्ग बंद झाल्याने ट्रॅक्टर, बैलगाडी, दुचाकी यांची वाहतूक अशक्य झाली असून काही ठिकाणी पायी जाणेदेखील कठीण बनले आहे. लोणी येथील प्रसिद्ध मशनेर देवस्थानाकडे जाण्यासाठी भूतनीहिप्परगा परिसरातील भाविक आजही या मागार्चा वापर करतात. तसेच पूर्वी आसपासच्या गावांतील आणि तांड्यांतील विद्यार्थी शिक्षणासाठी लोणी येथे याच मागार्ने ये-जा करत होते. त्यामुळे ही वाट दोन गावांमधील सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक नात्यांची साक्ष देणारा ऐतिहासिक वारसा असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.ग्रामीण भागातील पानंद रस्ते आणि पाऊलवाटा या केवळ मातीच्या वाटा नसून त्या अनेक पिढ्यांच्या इतिहासाच्या साक्षीदार असतात. अनेक मार्ग महसूल नोंदीत नसले तरी सार्वजनिक वापरामुळे त्यांना व्यवहारिक मान्यता प्राप्त झालेली असते. लोणी-भूतनीहिप्परगा मार्गही अशाच ऐतिहासिक मागांपैकी एक आहे. वाहनांची सुविधा नसलेल्या काळात शेतकरी याच वाटेने मुक्रमाबाद बाजारात जाऊन मुग, उडीद, ज्वारी, डाळी आणि इतर शेतमालाची विक्री करत होते. त्यामुळे या मागाचें ऐतिहासिक आणि आर्थिक महत्त्व आजही कायम आहे.परिसरात पेरणीचा हंगाम सुरू झाला की पानंद रस्त्यांवरील वाद, कालवे खोदणे, दगड टाकणे, मार्ग अडविणे आणि प्रशासनाकडे तक्रारी दाखल होणे हा जणू नित्यक्रमच बनला आहे. महसूल विभागाकडून पंचनामे, बैठका आणि आश्वासने दिली जात असली तरी प्रश्न कायम असल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. यामुळे पानंद रस्त्यांच्या मूळ हद्दी निश्चित करून ते कायमस्वरूपी मोकळे ठेवावेत, अशी मागणी आता अधिक तीव्र झाली आहे.शेतकरी आणि ग्रामस्थांनी महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामपंचायतीने संयुक्त पाहणी करून मूळ पानंद रस्ते आणि ऐतिहासिक पाऊलवाटा तातडीने मोकळ्या कराव्यात, अशी मागणी केली आहे. तसेच शासनमान्य किंवा पिढ्यानपिढ्या सार्वजनिक वापरात असलेल्या मार्गांवर अडथळे निर्माण करणाऱ्यांविरुद्ध महसूल कायद्यानुसार तसेच फौजदारी स्वरूपाची कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशीही मागणी पुढे येत आहे

