क्षेत्र सहाय्यक, बीट वनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात; ₹20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक

क्षेत्र सहाय्यक, बीट वनरक्षक व वनमजूर एसीबीच्या जाळ्यात; ₹20 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक


 (महेश निमसटकर 
 जिल्हा विभागीय संपादक चंद्रपूर)



भद्रावती, दि. २७ : जप्त करण्यात आलेला ट्रॅक्टर कारवाई न करता सोडून देण्यासाठी ₹20 हजारांची लाच स्वीकारताना भद्रावती वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहाय्यक, बीट वनरक्षक आणि एका वनमजुराला चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी रंगेहात पकडले. या कारवाईमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील मांगली परिसरातून अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर वनविभागाने जप्त करून कार्यालय परिसरात ठेवला होता. संबंधित ट्रॅक्टरवर पुढील कारवाई न करता तो सोडून देण्यासाठी क्षेत्र सहाय्यक कोमल गुगलोत व बीट वनरक्षक संदीप पारवे यांनी ट्रॅक्टर मालकाकडे ₹20 हजारांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार चंद्रपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली होती.

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यानुसार सोमवारी भद्रावती वनविभाग कार्यालयात कोमल गुगलोत, संदीप पारवे तसेच वनमजूर ललित नागपुरे यांनी ₹20 हजारांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने तिघांनाही रंगेहात ताब्यात घेतले.

प्राथमिक माहितीनुसार, लाचेची रक्कम प्रत्यक्ष स्वीकारण्यास वनमजूर ललित नागपुरे यांना सांगण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कारवाईत वनमजुराचा नाहक सहभाग झाला असल्याची चर्चा वनविभागात सुरू आहे. या प्रकरणातील नेमकी भूमिका तपासाअंती स्पष्ट होणार आहे.

बातमी लिहीपर्यंत भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. संबंधित आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.
Previous Post Next Post