*भामलवाडीत माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडेचा भक्तिमय दिंडी सोहळा; वारकरी परंपरेचे जतन करत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*
(भामलवाडी तालुका रावेर प्रतिनिधी नरेंद्र भालेराव)
पुरी- गोलवाडे ता. रावेर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिंडी सोहळ्याने भामलवाडी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. माध्यमिक विद्यालय पुरी गोलवाडे ते भामलवाडी गावापर्यंत निघालेल्या दिंडीत विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महिला व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.
*'ज्ञानोबा-तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल' या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदुंगाच्या गजरात निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल व माता रुक्मिणी यांची आकर्षक वेशभूषा साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पावली, फुगडी आणि वारकरी परंपरेतील विविध भक्तिमय उपक्रमांमुळे दिंडीला विशेष रंगत आली.
*
भामलवाडी गावातील भजनी मंडळींनी सुमधुर अभंग व भजन सादर करून वातावरण अधिक भक्तिमय केले. गावातील महिला, पुरुष, विद्यार्थी आणि शिक्षकांनीही एकत्र ठेका धरत फुगडीत सहभाग घेतल्याने सामाजिक ऐक्य आणि संस्कृतीचे सुंदर दर्शन घडले.
या दिंडी सोहळ्याचे *संस्थेचे अध्यक्ष मा. आण्णासो मनोज पाटील सर तसेच संस्थेच्या आदरणीय माईसाहेब (सचिव)* यांनी विशेष कौतुक करून विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संस्कृतीचे संस्कार रुजविणाऱ्या या उपक्रमाचे अभिनंदन केले.
*शाळेचे मुख्याध्यापक मा. राहुल पाटील सर* यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा दिंडी सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, नियोजनबद्ध आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
दिंडी सोहळ्याची सांगता सर्व विद्यार्थी, ग्रामस्थ, महिला व उपस्थितांना फराळाचे वाटप करून करण्यात आली. वारकरी परंपरेचा वारसा जपत भक्ती, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविणारा हा उपक्रम सर्वांच्या मनात कायमची आठवण निर्माण करून गेला.

