खा.संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा -निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाची मागणी.
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड :ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाणीची धमकी दिल्याच्या घटनेचा निषेध करत, त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी बिलोली तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली. याबाबत उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे तसेच पोलीस निरीक्षक, बिलोली यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, एका वादग्रस्त विधानासंदर्भात पत्रकारांनी लोकशाही पद्धतीने खासदार संजय दिना पाटील यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले असता त्यांनी उत्तर देण्याऐवजी पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली व "पुन्हा प्रश्न विचारला तर मारून पाठवीन" अशी धमकी दिली. लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचे वर्तन होणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवर आघात करणारे असून संपूर्ण पत्रकारितेसाठी चिंतेची बाब असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
या प्रकरणामुळे राज्यभरातील पत्रकारांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली असून संबंधित खासदारावर तातडीने कायदेशीर कारवाई करून पत्रकारांना संरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका कार्याध्यक्ष सय्यद रियाज, तालुकाध्यक्ष संजयकुमार बिलोलीकर, पत्रकार मारोती भुसावळे, मिलिंद मांजरमकर, राजकुमार गादगे यांच्यासह अन्य पत्रकार उपस्थित होते.
अध्यक्षांचे मत :
"पत्रकारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेने दिलेला लोकशाही अधिकार आहे. कोणत्याही लोकप्रतिनिधीने पत्रकारांना शिवीगाळ करणे किंवा मारहाणीची धमकी देणे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घटनांमुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. दोषींवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाई करून पत्रकारांना निर्भय वातावरणात काम करण्याची हमी शासनाने द्यावी," असे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पवाडे यांनी सांगितले.

