प्रेरणामासात बिलोलीत फुलली हरित चळवळ*शिक्षक सेनेच्या महावृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणाचा निर्धार; वृक्षसंवर्धनाचा दिला प्रभावी संदेश*

प्रेरणामासात बिलोलीत फुलली हरित चळवळ

*शिक्षक सेनेच्या महावृक्षारोपणातून पर्यावरण संरक्षणाचा निर्धार; वृक्षसंवर्धनाचा दिला प्रभावी संदेश*

(मारोती एडकेवार 
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )

नांदेड :पर्यावरणप्रेमी तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त २७ जून ते २७ जुलै या कालावधीत राबविण्यात आलेल्या 'प्रेरणामास' उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने बिलोली तालुक्यात उत्साहात महावृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाची जनजागृती, हरित महाराष्ट्राचा संकल्प आणि भावी पिढीसाठी निसर्ग संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्यसम्राट शिक्षक आमदार तथा राज्याध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांच्या आवाहनानुसार, राज्य उपाध्यक्ष विठ्ठल (विठू) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नांदेड जिल्हाध्यक्ष संतोष पाटील अंबुलगेकर यांच्या सूचनेनुसार बिलोली तालुक्यातील विविध शाळा, शासकीय कार्यालये व सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात शिक्षक सेनेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच पर्यावरणप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी शिक्षक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर हमंद, तालुका सचिव राजाराम कसलोड, तालुका उपाध्यक्ष शिवराज गागीलगे, इरेशाम झम्पलकर, गट साधन केंद्र बिलोलीचे विषयतज्ज्ञ सुरेश राठोड, गुणवंत हलगरे, प्रल्हाद ढाकणे, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका गजरा सावळे, शिक्षिका अश्विनी कोतवाड, त्यांच्या सहकारी शिक्षिका, तालुक्यातील साधन व्यक्ती तसेच पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते.
पर्यावरणप्रेमी शिक्षक तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे बिलोली तालुका अध्यक्ष बालाजी गेंदेवाड यांच्या पुढाकारातून विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपस्थितांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली तसेच प्रत्येकाने लावलेल्या वृक्षाचे संगोपन करून पर्यावरण रक्षणात आपला सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी मान्यवरांनी हवामान बदल, वाढते तापमान आणि पर्यावरणीय असमतोल यावर मात करण्यासाठी वृक्षारोपणासोबत वृक्षसंवर्धन तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. शिक्षक सेना ही संघटना वर्षातील ३६५ दिवस वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे कार्य सातत्याने राबवत असून, 'फोटोपुरते वृक्षारोपण नव्हे, तर वृक्षाचा वाढदिवस साजरा करून त्याचे संगोपन' ही कार्ला (बु.) येथून सुरू झालेली अभिनव संकल्पना आज राज्यभर प्रेरणादायी ठरत आहे.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने पर्यावरणप्रेमी शिक्षक तथा बिलोली तालुका अध्यक्ष बालाजी गेंदेवाड यांना गतवर्षी 'राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले होते. हा सन्मान बिलोली तालुक्यातील पर्यावरण चळवळीचा आणि शिक्षक सेनेच्या सातत्यपूर्ण सामाजिक बांधिलकीचा गौरव मानला जात आहे.
प्रेरणामासानिमित्त राबविण्यात आलेल्या या महावृक्षारोपण अभियानामुळे पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती अधिक व्यापक झाली असून, "वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि हरित महाराष्ट्र घडवा" हा संदेश समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचला आहे. शिक्षक सेनेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Previous Post Next Post