*वर्ध्यानंतर आता हिंगणघाट हादरलं! हॉस्पिटलमधून जेवण आणण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीला फूस लावून नेल्याचा आरोप; रवी ठोंबरेविरुद्ध पोक्सोसह गंभीर गुन्हा*
(हिंगणघाट वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)
काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित घडलेल्या धक्कादायक घटनेची चर्चा अजूनही सुरू असतानाच आता हिंगणघाटमध्येही अशाच स्वरूपाची एक घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून १२ वर्षीय मुलीला फूस लावून घेऊन गेल्याचा आरोप एका युवकावर करण्यात आला असून, या प्रकरणी रवी ठोंबरे राहणार निशाणपुरा वार्ड, याच्याविरुद्ध हिंगणघाट पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो कायद्यान्वये गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी असरार इम्तियाज खान पठाण (वय ४८, रा. वेळा , तालुका हिंगणघाट) हे मलक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. त्यांच्यासोबत त्यांची १२ वर्षीय मुलगी देखील होती. २४ जुलै रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास वडिलांसाठी जेवण आणण्यासाठी तिला जवळील जनता हॉटेलमध्ये पाठविण्यात आले.
मात्र बराच वेळ होऊनही मुलगी परत न आल्याने कुटुंबीयांची धावपळ सुरू झाली. परिसरात शोधाशोध करण्यात आली. यावेळी काही नागरिकांनी संबंधित मुलगी एका युवकासोबत जाताना पाहिल्याचे सांगितल्याचा उल्लेख फिर्यादीने तक्रारीत केला आहे.
तक्रारीनुसार, रवी ठोंबर याने अल्पवयीन मुलीला फूस लावून सोबत नेले. मुलीचा शोध घेत असताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात समोरासमोर भेट झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादीला धमकावल्याचा तसेच वाद घातल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने हिंगणघाट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीच्या आधारे पोलीसांनी एफआयआर क्रमांक ११८१/२०२६ नोंदवत भारतीय न्याय संहिता कलम १३७(२), ७५(२) तसेच पोक्सो कायद्याच्या कलम १२ अंतर्गत रवी ठोंबरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीशी संबंधित घडलेल्या गंभीर प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्या घटनेची चर्चा सुरू असतानाच हिंगणघाटमध्ये समोर आलेल्या या नव्या प्रकरणामुळे पालकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत असून, आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

