जिद्द, मेहनत आणि गुणवत्तेचे यश!
पुनखेडे जि.प. प्राथमिक शाळेचा प्रणव सपकाळे शिष्यवृत्ती परीक्षेत चमकला
(रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी (शिवा भाई)
ग्रामीण भागातील मर्यादित सोयी-सुविधा, मार्गदर्शनाचा अभाव आणि खाजगी क्लासची कोणतीही मदत नसतानाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुनखेडे (ता. रावेर) येथील इयत्ता चौथीचा विद्यार्थी प्रणव ललित सपकाळे याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे नुकताच इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला. पुनखेडे येथील मराठी शाळेतील १३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घेतला होता. त्यापैकी प्रणवने ३०० पैकी १३० गुण मिळवून शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरण्याचा मान मिळवला. विशेष म्हणजे शाळेतील काही विद्यार्थी केवळ १ ते २ गुणांनी पात्रतेपासून वंचित राहिले.
या यशामागील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, संपूर्ण वर्षभर शाळेत जितेंद्र गवळी हे एकमेव शिक्षक म्हणून मुख्याध्यापक व वर्गशिक्षकाची जबाबदारी सांभाळत होते. सर्व वर्गांचे अध्यापन, शालेय कामकाज आणि विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाल्याचे सर्व स्तरातून गौरविले जात आहे.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील यांनी सांगितले की, "एकाच शिक्षकाने संपूर्ण शाळेची धुरा सांभाळत विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली तयारी आणि दाखवलेली तळमळ खरोखरच कौतुकास्पद आहे. हे यश म्हणजे शिक्षक जितेंद्र गवळी यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती आहे."
प्रणव सपकाळे यांच्या या यशामुळे पुनखेडे गावाच्या शैक्षणिक लौकिकात भर पडली आहे. या यशाबद्दल रावेरचे गटशिक्षणाधिकारी रविंद्र बखाल, केंद्र समन्वयक प्रकाश महाजन, ग्रामपंचायत सरपंच कीर्ती पाटील, उपसरपंच डिगंबर बोरसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशोर पाटील, उपाध्यक्ष भगवान बोरसे, मुख्याध्यापक छगन पाटील, वर्गशिक्षक जितेंद्र गवळी, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य कार्यकारिणी सदस्य, उत्तर महाराष्ट्र संघटक, दैनिक लोकशाहीचे प्रतिनिधी व श्रद्धा सबुरी बुट हाऊसचे संचालक मा. श्री. विनोद रामचंद्र कोळी (शिवा भाई G) यांनी प्रणवचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्रणव हा त्यांचा पुतण्या असून, गावातील पालक व ग्रामस्थांनीही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

