*रस्त्यांच्या कडेला पडून असलेल्या जीर्ण देवतांच्या मूर्तींचे सन्मानपूर्वक विसर्जन....*
* "एक हात मदतीचा भोई समाज अभियान विकास संस्था"च्या पुढाकारातून अमरावतीत सुमारे दोन हजार मूर्तींचे संकलन; धार्मिक श्रद्धा जपत जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम
देवळी तालुका प्रतिनिधी:-रविंद्र पारिसे
अमरावती शहराच्या विविध भागांतील रस्त्यांच्या कडेला, मोकळ्या जागांमध्ये व सार्वजनिक ठिकाणी अनेक वर्षांपासून जीर्ण, भग्न व झिजलेल्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती बेजबाबदारपणे टाकून दिलेल्या असल्याचे निदर्शनास आले. या मूर्तींमध्ये हात, पाय, डोके तुटलेल्या तसेच पूर्णपणे झिजलेल्या मूर्तींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. ही बाब धार्मिक श्रद्धा जपणाऱ्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून, अशा प्रकारामुळे समाजात गैरसमज निर्माण होण्याबरोबरच हिंदू धर्मावर टीका करण्याची संधीही काही प्रवृत्तींना मिळत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर "एक हात मदतीचा भोई समाज अभियान विकास संस्था" यांच्या वतीने सामाजिक व धार्मिक जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे समन्वयक गजानन बावने व रुनाली बावने यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मथुरा गणेश सुरजूसे आणि नीळकंठ उत्तम सुरजूसे यांच्या सहकार्याने शहरातील विविध भागांतून रस्त्यांच्या कडेला टाकून दिलेल्या सुमारे दोन हजार जीर्ण व भग्न मूर्तींचे संकलन करण्यात आले.
संकलित करण्यात आलेल्या सर्व मूर्तींचे हिंदू धर्मपरंपरेनुसार सन्मानपूर्वक व योग्य पद्धतीने विसर्जन करण्यात आले. हा उपक्रम केवळ मूर्ती विसर्जनापुरता मर्यादित न राहता धार्मिक भावना जपणे, पर्यावरण संवर्धन आणि समाजात जनजागृती निर्माण करणे या उद्देशाने 'मानव जागर अभियान' याला समर्पित करण्यात आला.
या उपक्रमामुळे धार्मिक स्थळे व सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचा संदेश समाजात पोहोचला असून, जीर्ण झालेल्या मूर्तींची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबत नागरिकांनी जागरूक राहावे, असे आवाहनही करण्यात आले.
या सामाजिक व धार्मिक जाणीवेतून राबविण्यात आलेल्या उपक्रमासाठी गजानन बावने, नीळकंठ उत्तम सुरजूसे, मथुरा गणेश सुरजूसे, रुनाली बावने, यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, दुर्लक्षित राहिलेल्या या महत्त्वाच्या विषयाकडे त्यांनी लक्ष वेधून समाजाप्रती आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.
"एक हात मदतीचा भोई समाज अभियान विकास संस्था" सामाजिक बांधिलकी जपत अशाच लोकहिताच्या उपक्रमांद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

