हिंगणघाट येथे राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान" उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या शिबिराच्या माध्यमातून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ थेट सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.
(वर्धा जिल्हा विभागीय उपसंपादक मो मकसुद बावा)
आज दिनांक.31/7/2026 ला अनुसया पॅलेस हिंगणघाट येथील समाधान शिबिर घेण्यात आल
या शिबिरामध्ये महसूल, कृषी, पंचायत समिती, नगरपरिषद, पुरवठा, संजय गांधी निराधार, भूमी अभिलेख, वन विभाग, आरोग्य, उद्योग, पशुसंवर्धन, आदिवासी विकास, अन्न व औषध प्रशासन यांसह विविध विभागांनी सहभाग घेत नागरिकांना एकाच ठिकाणी शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला. हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातील तब्बल २,६०४ लाभार्थ्यांना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्यात आला, तर अनेक नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे, सनदा, दाखले आणि इतर प्रशासकीय सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या.*
महसूल विभागामार्फत सर्वांसाठी घरे योजनेअंतर्गत पट्ट्यांचे वाटप, नजूल फ्री-होल्ड पट्टे, जात, उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रे तसेच विविध महसुली प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या शेकडो लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तर पुरवठा विभागामार्फत प्राधान्य व अंत्योदय योजनेतील पात्र लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले.
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली कृषी अवजारे व उपकरणे उपलब्ध करून देण्यात आली. यामध्ये ट्रॅक्टर, नांगर, रोटाव्हेटर, टोकण यंत्र, तुषार सिंचन संच, पॅकहाऊस, फळबाग विकास तसेच महिला शेतकरी योजनांसह विविध कृषी योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांना देण्यात आला. यामुळे शेती अधिक आधुनिक, उत्पादनक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.
याशिवाय पंचायत समितीमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, सिंचन विहिरी, लखपती दीदी योजना व महिला बचत गटांना आर्थिक सहाय्याचे वितरण करण्यात आले. नगरपरिषदेमार्फत पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांचे वितरण करण्यात आले. वन विभागामार्फत वन्यजीव हानीग्रस्त लाभार्थ्यांना आर्थिक मदत देण्यात आली, तर इतर विभागांकडून आयुष्मान भारत कार्ड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना तसेच विविध आरोग्य व कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.
शासनाच्या योजना थेट नागरिकांच्या दारी पोहोचवून त्यांना त्यांच्या हक्काचे लाभ वेळेत मिळावेत, प्रशासन अधिक लोकाभिमुख व्हावे आणि जनतेच्या समस्या एकाच ठिकाणी सोडविल्या जाव्यात, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले हे "छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर" जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम खऱ्या अर्थाने जनकल्याणाचा उत्सव ठरला.
मो मक्सूद बावा पत्रकार हिंगणघाट जिल्हा वर्धा मिडिया पोलिस टाइम विभागीय उपसंपादक

