भोंदूबाबाविरोधात आवाज उठवणाऱ्या 'अंनिस' पदाधिकाऱ्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न; आरोपीवर गुन्हा दाखल
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड :बिलोली तालुक्यात
अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि बनावट चमत्कारांविरोधात सातत्याने जनजागृती करणारे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) राज्य सहकार्यवाह तथा पत्रकार कमलाकर चंद्रकांत जमदडे यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आरोपीविरुद्ध बिलोली पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६ ते ६:३० वाजेच्या सुमारास कासराळी–रुद्रापूर मार्गावर ही घटना घडली. फिर्यादी कमलाकर जमदडे हे जात असताना आरोपी ज्ञानेश्वर नागोराव करडे याने आपली मोटारसायकल रस्त्यात आडवी लावून त्यांचा मार्ग अडवला. त्यानंतर आरोपीने जमदडे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पूर्वी अंधश्रद्धा निर्मूलनाशी संबंधित झालेल्या कारवाईचा राग मनात धरूनच आरोपीने हा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल
या घटनेप्रकरणी बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०१६३/२०२६ नोंदवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम २८१, १२६(२), ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गंगाप्रसाद चंद्रराव मिरदोडे करत आहेत. भोंदूगिरीविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यावर अशा प्रकारे उघडपणे धमकी देण्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली असून, आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक वर्तुळातून केली जात आहे.

