दलित वस्तीच्या स्ट्रीटलाईट योजनेचा, उजेड की निकृष्ट कामाचा अंधार.
पावसात खांब जमीनदोस्त वायर जळाल्याने, करंट उतरण्याचा नागरिकांच्या जीविताला धोका.
(मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड )
नांदेड :बिलोली दलित वस्तीच्या विकासासाठी शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या स्ट्रीटलाईटच्या कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बिलोली शहरातील संबंधित परिसरात बसविण्यात आलेले काही स्ट्रीटलाईटचे खांब साध्या पावसाच्या पाण्यामुळेच जमीनदोस्त झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे लाखो रुपयांच्या योजनेच्या कामाची गुणवत्ता नेमकी कोण तपासली? असा सवाल उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे, जाधव यांच्या घराजवळील स्ट्रीटलाईटच्या खांबाची वायर जळाल्याचे सांगितले जात असून, खांबामध्ये वीजप्रवाह उतरल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे. काही नागरिकांना विजेचा शॉक लागल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी संबंधितांना वीजपुरवठा बंद करण्यास सांगितले असल्याची माहिती आहे.
प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही. लाईट बंद झाल्यानंतर बल्ब बदलण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी कर्मचारी खांबावर चढणार तरी कसे? कारण बसविण्यात आलेले खांब अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचा आरोप होत असून, त्यावर चढणेही धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
भंगार खांब आणून पॉलिश? नागरिकांचा गंभीर आरोप
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही खांब भंगारातून आणून त्यावर पॉलिश करून दलित वस्तीत बसविण्यात आले आहेत. बसवल्यानंतर अवघ्या काही दिवसांत चमकणारे खांब काळवंडू लागल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
जर हे आरोप खरे असतील, तर दलित वस्तीच्या नावाखाली मंजूर झालेल्या विकास निधीच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे का? हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा ठाकला आहे.
कामाचे बिल थांबवून चौकशी करा!
निकृष्ट साहित्य वापरण्यात आले आहे का, खांबांची गुणवत्ता काय आहे, वायरिंगचे काम कोणत्या दर्जाचे करण्यात आले, कामाची तांत्रिक तपासणी कोणी केली आणि प्रत्यक्ष कामाच्या तुलनेत किती बिल मंजूर करण्यात आले, याची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंत्राटदाराचे देयक रोखण्यात यावे, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.
दलित वस्तीच्या विकासासाठी आलेला निधी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि दर्जेदार सुविधांसाठी आहे; तो निकृष्ट कामासाठी वापरला जात असेल तर संबंधितांवर जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे.
फोटो आणि व्हिडिओमध्ये दिसणारी खांबांची अवस्था प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
आता प्रशासन या ‘स्ट्रीटलाईट’च्या अंधारावर प्रकाश टाकणार का, की निकृष्ट कामाच्या तक्रारींकडेही नेहमीप्रमाणे दुर्लक्ष होणार?

