देगलूर तालुक्यात कर्जमुक्तीच्या पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध.
आधार प्रमाणीकरणाला सुरुवात वेळेत श-घधउ पूर्ण केल्यासच कर्जमाफीचा लाभ; शेतकऱ्यांना प्रशासनाचे आवाहन.
माहेमूद पिंजारी
तालुका प्रतिनिधी देगलूर
देगलूर : राज्य शासनाच्या
कर्जमुक्ती योजनेअंतर्गत देगलूर तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, या यादीतील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC) करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पात्र लाभार्थ्यांनी वेळेत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाच्या निर्देशानुसार संबंधित बँका, सेवा सहकारी संस्था तसेच नियुक्त केंद्रांमार्फत आधार प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खाते व आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहून प्रमाणीकरण पूर्ण करावे. प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पुढे सरकणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्राथमिक यादीमध्ये नाव नसलेल्या किंवा नाव, आधार क्रमांक, बँक खाते अथवा इतर तपशीलांमध्ये त्रुटी असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित बँक किंवा कृषी विभागाशी संपर्क साधून हरकती व दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण करावी. यादीतील तपशील अचूक असणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी माहिती काळजीपूर्वक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्जमुक्ती योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत पारदर्शकपणे पोहोचावा, यासाठी प्रशासनाक २डून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम लाभार्थी यादी निश्चित करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. दरम्यान, तालुक्यातील अनेक शेतकरी यादी पाहण्यासाठी व आधार प्रमाणीकरणासाठी बँका आणि सेवा केंद्रांमध्ये गर्दी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन संबंधित यंत्रणेकडून करण्यात आले आहे.

