भंगाराम वॉर्डातील बिबट्याची दहशत अखेर संपली; वनविभागाने दुपारी दोन वाजता जेरबंद केला
आठवडाभर शहरात मुक्त संचार; बकरीवर हल्ला, कुत्र्यावर टपून बसलेला बिबट अखेर पिंजऱ्यात
(महेश निमसटकर
जिल्हा विभागीय संपादक भद्रावती चंद्रपुर)
भद्रावती, दि. ३१ : शहरातील भंगाराम वॉर्ड, पिंडोनी स्मशानभूमी, आयडिया टेलिकॉम टॉवर, पद्मावर वाडी, पिंडोनी तलाव आणि शिवाजी नगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून दहशत निर्माण करणारा बिबट अखेर शुक्रवारी (दि. ३१) दुपारी सुमारे २ वाजता वनविभागाच्या सापळ्यात जेरबंद झाला. या यशस्वी कारवाईमुळे भीतीच्या छायेत वावरणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकत वनविभागाचे आभार मानले.
गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर शहरातील पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय, महावितरण कार्यालय, क्रीडा संकुल, पिंडोनी स्मशानभूमी, पद्मावर वाडी आणि शिवाजी नगर परिसरात वारंवार दिसून येत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाला सातत्याने तक्रारी मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत ३० आणि ३१ जुलै रोजी विविध ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे नियोजन केले.
शुक्रवारी सकाळी सुमारे ६ वाजता भंगाराम वॉर्डातील भाऊराव धुळे यांच्या घराशेजारील बकऱ्यांच्या गोठ्यात बिबट शिरला. त्याने एका पाळीव बकरीवर झडप घालत तिला जखमी केले. याचवेळी शेजारील रोहित सिदम, इमरानभाई आणि खाडे यांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
त्यानंतर पद्मावर वाडी ग्रामोद्योग संघाजवळील खाडे यांच्या घराच्या भिंतीवर बसून तो पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी दबा धरून बसल्याचे नागरिकांनी पाहिले. तसेच आयडिया टॉवर परिसरातील खुशाल आत्राम यांच्या घराजवळही कुत्र्यावर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला फटाके फोडून बिबट्याला सुरक्षित दिशेने हुसकावण्यात आले. त्यानंतर त्याच्या हालचाली लक्षात घेऊन शिवाजी नगर परिसरातही पिंजरा उभारण्यात आला.
वनविभागाच्या संयमी आणि नियोजनबद्ध कारवाईला अखेर यश आले आणि दुपारी सुमारे २ वाजता बिबट पिंजऱ्यात अडकला. बिबट जेरबंद झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी भद्रावती पोलिसांना पाचारण करण्यात आले. बिबट चिडू नये म्हणून वनविभागाने पिंजरा ग्रीन नेटने झाकून ठेवला, तर पोलिसांनी गर्दी पांगवून परिसर सुरक्षित केला.
जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला वनविभागाच्या गंधा नाला नर्सरी येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून त्याची वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचार केल्यानंतर त्याला राखीव जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांनी दिली.
या मोहिमेत क्षेत्र सहाय्यक के. डी.कांबळे,प्रभारी क्षेत्र सहाय्यक ठाकरे, वरक्षक जितेंद्र देवगडे,किशोर मडावी, अनिल शेंद्रे, पवन मांढरे, नितीन राऊत,अमर किन्नाके,शिथिल मडावी, दिपक निंबाळकर, सार्ड एनजीओ संघटना पथक तसेच वनविभागाच्या इतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, भंगाराम वॉर्डातील तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडी, साचलेला कचरा, सांडपाण्याची समस्या, अपुरी वीज व्यवस्था आणि दुर्लक्षित स्वच्छता यामुळे हा परिसर वन्यप्राण्यांसाठी पोषक ठरत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या मूलभूत समस्या सोडविण्यात नगर परिषद प्रशासन अपयशी ठरल्याची नाराजीही नागरिकांनी व्यक्त केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तलाव परिसराची स्वच्छता, झाडांची छाटणी, कचऱ्याची विल्हेवाट, सांडपाण्याचा निचरा आणि आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

