बौद्धजन पंचायत समिती, तालुका म्हसळा यांच्या वतीने वर्षावास प्रारंभ कार्यक्रम उत्साहात संपन्न......
(रायगड जिल्हा विभागीय संपादक नवनाथ लोकरे)
म्हसळा, दि. २९ जुलै : बौद्धजन पंचायत समिती, तालुका शाखा म्हसळा यांच्या वतीने आषाढी पौर्णिमेनिमित्त आयोजित वर्षावास प्रारंभ कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, म्हसळा येथे उत्साहपूर्ण व धम्ममय वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनंत पवार होते. अनंत येलवे यांनी स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थितांचे स्वागत केले, तर सभी पवार गुरुजी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
कार्यक्रमाला हरिचंद्र मोहिते सर, रश्मी तांबे, शोभा मोरे, अशोक जाधव, बौद्धाचार्य रमेश तांबे, ममता येलवे, युवा प्रबोधनकार अर्चना येलवे, रिया मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच निशा मोरे, निशांत मोरे, मीनाताई पवार, प्रदीप पवार, युवा कार्यकर्ते सिद्धार्थ मोरे, नितेश मोरे यांच्यासह अनेक धम्मबंधू-भगिनी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंत येलवे यांनी केले. आपल्या मनोगतात त्यांनी वर्षावास हा केवळ धार्मिक उपक्रम नसून समाजाला एकत्र आणणारा आणि धम्माची शिकवण एकमेकांपर्यंत पोहोचविणारा उपक्रम असल्याचे सांगितले. वर्षावास सामूहिक पद्धतीने साजरा करून धम्माचा अभ्यास, चिंतन आणि आचरण करणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटक सभी पवार गुरुजी यांनी आपल्या भाषणात वर्षावासाच्या निमित्ताने संपूर्ण समाजाने एकत्र येऊन धम्मकार्यामध्ये सहभागी व्हावे, धम्मश्रवण व धम्माचरण वाढवावे, असे आवाहन केले. वर्षावास सामूहिकरीत्या साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ममता येलवे यांनी आषाढी पौर्णिमेचे महत्त्व विशद करत वर्षावासाशी निगडित बौद्धकालीन चार महत्त्वपूर्ण घटनांची माहिती दिली. युवा प्रबोधनकार अर्चना येलवे यांनी वर्षावासाचा इतिहास, तो का साजरा केला जातो आणि आजच्या काळातील बौद्ध धम्माचे महत्त्व याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले.
रश्मी तांबे यांनी वर्षावासाच्या माध्यमातून बौद्ध धम्मातील नैतिक मूल्ये, शील, प्रज्ञा आणि समाजातील एकात्मता दृढ होते, असे सांगितले. अशोक जाधव यांनी उपस्थितांना वर्षावासाच्या शुभेच्छा देत धम्मकार्य अधिक जोमाने राबविण्याचे आवाहन केले.
हरिचंद्र मोहिते सर यांनी मार्गदर्शन करताना, "धम्म प्रथम स्वतःच्या जीवनात आचरणात आणावा आणि त्यानंतरच इतरांना सांगावा. पंचशीलाचे प्रामाणिक पालन करणारी व्यक्तीच समाजासाठी आदर्श ठरते," असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय समारोपात अनंत पवार यांनी वर्षावासाच्या माध्यमातून समाजात एकता, बंधुभाव आणि धम्मजागृती निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे वर्षावास साजरा करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन रुपेश गमरे यांनी केले. तर रिया पवार यांनी उपस्थित सर्व मान्यवर, धम्मबंधू-भगिनी व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

