डॉ. कमलाआई गवई यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; शेषनाग गजभिये यांचा सामाजिक उपक्रमाचा वस्तुपाठ!
(वर्धा जिल्हा प्रतिनिधी - विपुल पाटील )
अमरावती:
ज्येष्ठ समाजसेविका डॉ. कमलाआई गवई यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त शेषनाग गजभिये यांनी एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी धम्म अमरावती विपश्यना केंद्र, लुंबिनी (मोगरा) येथे ८४ बोधिरूक्षांचे रोपण करून हा वाढदिवस अत्यंत पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला.
याप्रसंगी बोलताना शेषनाग गजभिये यांनी सर्वांना एक मोलाचा संदेश दिला. ते म्हणाले की, "वाढदिवस साजरा करताना केवळ दिखावा करण्यापेक्षा निसर्गाचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, हा समाजोपयोगी उपक्रम सर्वांनी आपल्या जीवनात अंगीकारावा."
निसर्ग संवर्धनाचा हा संदेश देत त्यांनी पर्यावरणाप्रती आपली सामाजिक जबाबदारी अधोरेखित केली. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

