पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग १६१ वर भीषण अपघात*

*पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळ राष्ट्रीय महामार्ग १६१ वर भीषण अपघात*

(पातुर अकोला तालुका प्रतिनिधी दूल्हे खान)

पातूर येथील नानासाहेब मंदिराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर १० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३० बीबी ३८५७ आणि दुचाकी क्रमांक एमएच २७ एवाय ४५२७ यांच्यात भीषण धडक झाली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, चारचाकी वाहन अकोल्याकडून येत होते. त्याचवेळी दुचाकीस्वार महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. चारचाकी चालकाने दुचाकीला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र जोरदार धडक टाळता आली नाही. या अपघातात दुचाकीस्वार पातूर येथील राजू निमकंडे हे गंभीर जखमी झाले, तर धडकेनंतर चारचाकी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ते महामार्गावरून खाली उतरले.

घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रवाना करण्यात आले.

याच ठिकाणी यापूर्वीही झाला होता अपघात

स्वतःच्या सोयीसाठी महामार्गावरील दुभाजक (डिव्हायडर) तोडून मधूनच रस्ता तयार करण्याची प्रवृत्ती पुन्हा एकदा जीवघेणी ठरल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अपघातस्थळाची पाहणी केल्यानंतर नागरिकांनीही मनमानी पद्धतीने डिव्हायडर तोडून तयार करण्यात आलेले मार्ग गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे सांगितले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.
Previous Post Next Post