*"ठाणेदार अनिल राऊत यांना तात्काळ निलंबित करा; अन्यथा पत्रकार संघटना शांत बसणार नाही" — पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन*
( मो मकसूद बावा पत्रकार हिंगणघाट जिला वर्धा मीडीया पोलीस टाईम विभागीय उपसंपादक )
हिंगणघाट पोलीस ठाण्याचे ठाणेदार अनिल राऊत यांनी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान यांच्याशी कथित गैरवर्तन केल्याच्या प्रकरणी हिंगणघाट तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेने आक्रमक भूमिका घेत राज्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना निवेदन सादर केले. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून ठाणेदार अनिल राऊत यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा पत्रकार संघटना शांत बसणार नसून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.
रविवार, दि. १२ जुलै रोजी हिंगणघाट नगर परिषद येथे आयोजित आढावा बैठकीसाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित असताना पत्रकार संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी पत्रकारांशी झालेल्या कथित गैरवर्तनाचा संपूर्ण घटनाक्रम पालकमंत्र्यांसमोर मांडण्यात आला.
संघटनेच्या निवेदनानुसार, दि. ५ जुलै रोजी ज्येष्ठ पत्रकार अब्बास खान हे वैयक्तिक कामानिमित्त पोलीस ठाण्यात गेले असता, परवानगी घेऊन ठाणेदारांच्या दालनात प्रवेश केला. काही नागरिकांसोबत सुरू असलेली चर्चा संपण्याची प्रतीक्षा करून त्यांनी स्वाक्षरीसाठी पत्र दिल्यानंतर ठाणेदारांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरत अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे अनेक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याचाही दावा संघटनेने केला आहे.
पत्रकार संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, हा केवळ एका पत्रकाराच्या सन्मानाचा प्रश्न नसून सर्वसामान्य नागरिकांच्या स्वाभिमानाशी निगडित विषय आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने नागरिकांशी सन्मानाने वागणे अपेक्षित असताना अशा प्रकारच्या कथित वर्तनामुळे पोलीस प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
तसेच, ठाणेदार अनिल राऊत यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही अनेक नागरिक, व्यापारी व तक्रारदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्याचा उल्लेख करत, अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
"जोपर्यंत ठाणेदार अनिल राऊत यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत हिंगणघाट तालुका डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना शांत बसणार नाही. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी लोकशाही मार्गाने लढा सुरूच राहील," असा स्पष्ट इशारा संघटनेने पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास ठाणेदार अनिल राऊत यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी पत्रकार संघटनेने पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे केली आहे.

