*नंदुरबारच्या केळीला मिळणार स्वतःची ओळख! पणन मंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा केळी बोर्ड स्थापनेला दिले तातडीने कार्यवाहीचे निर्देश..*
*आमदार राजेशदादा पाडवींच्या पाठपुराव्याला यश, Magnet योजनेतही जिल्ह्याचा समावेश होणार*
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील )
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील हजारो केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन मागणीला अखेर यश येण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्ह्यात स्वतंत्र केळी बोर्ड स्थापन करावा, या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी आमदार राजेशदादा पाडवी यांना दिले होते.
शेतकऱ्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नाची दखल घेत आमदार राजेशदादा पाडवी यांनी महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून ही महत्त्वपूर्ण मागणी शासन दरबारी लावून धरली. त्यांच्या या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे.
त्यांच्या प्रयत्नांची गांभीर्याने दखल घेत महाराष्ट्र राज्याचे पणन मंत्री मा. जयकुमार रावल यांनी पणन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नंदुरबार जिल्हा केळी बोर्ड स्थापनेची प्रक्रिया तातडीने पुढे नेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
नंदुरबार हा महाराष्ट्रातील प्रमुख केळी उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. स्वतंत्र केळी बोर्डाची स्थापना झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांना केळी पिकावर आधुनिक संशोधन, बाजारपेठेतील योग्य विपणन, निर्यातीच्या संधी, प्रक्रिया उद्योग उभारणी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आणि विविध शासकीय योजनांचा अधिक प्रभावी आणि थेट लाभ मिळणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, केळी बोर्ड स्थापनेनंतर नंदुरबार जिल्ह्यातील केळीचे दर हे जिल्ह्यातच ठरवले जातील, ज्यामुळे दलालांची साखळी तुटून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा खरा मोबदला मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
याचबरोबर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी भविष्यातील 'Magnet' (Maharashtra Agribusiness Network) योजनेत नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देशही दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील कृषी व्यवसायाला आणि केळी प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळणार आहे.
आमदार राजेशदादा पाडवी यांच्या पाठपुराव्यामुळे आणि पणन मंत्र्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण आहे.

