*एकीकडे महाराष्ट्र भिजतोय, दुसरीकडे तालुक्यात ढग येतात, डोकावतात आणि निघून जातात !*
*शहादा जळतोय, तालुक्याला लागलंय कोणाचं ग्रहण !*
(नंदुरबार जिल्हा विभागीय उपसंपादक प्रा. डी. सी. पाटील)
शहादा : राज्यभरात वरुणराजा तुफान बरसतोय. धरणं ओव्हरफ्लो होताहेत, नद्या दुथडी भरून वाहताहेत. शेजारच्या गुजरातमधील सुरत जिल्ह्यातही मुसळधार पाऊस कोसळतोय, पण आमच्या शहादा तालुक्याच्या नशिबी मात्र केवळ निराशाच आहे.
शहादा तालुक्यात पावसाची अवस्था म्हणजे निव्वळ थट्टा बनली आहे. कपडेही पूर्ण भिजणार नाहीत असा तुरळक शिडकावा पडतो, ढग येतात, डोकावतात आणि पाणी न देता निघून जातात. आमच्या तालुक्याला नक्की कोणाचे ग्रहण लागले आहे, तेच समजत नाही, अशी हतबल प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून येत आहे.
शेतकऱ्यांच्या मते, ओला दुष्काळ एक वेळ परवडला. त्यात निदान पीक गेलं तरी जमिनीत पाणी मुरतं आणि रब्बी हंगामाची तरी आशा जिवंत राहते. पण हा कोरडा दुष्काळ तर जमिनीच्या पोटातलं शेवटचं थेंब न् थेंब पाणी पिऊन टाकतो. यामुळे शेतकरी आर्थिक खड्ड्यात जातोच, पण पुढच्या हंगामाचं भविष्यही पूर्ण अंधारात जातं.
या संकटात शासनाची मदत म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याची खंत व्यक्त होत आहे. आणि कहर म्हणजे, शेजारच्या एखाद्या गावात दोन थेंब जास्त पडले की अधिकारी लगेच आणेवारी वाढवायला पुढे सरसावतात.
पूर्वीच्या काळी पाऊस येत नसेल तर ग्रामीण शेतकरी पाऊस येईपर्यंत गाव मंदिरातील महादेवाची पिंड नदीचे वाहते पाणी आणून पूर्ण बुडवून ठेवत आणि पाऊस येईपर्यंत आळीपाळीने दिवस-रात्र रामधूनचा गजर करत असत. अन् पाऊसही विनंतीला मान देत होता. पण आता नदीतच पाणी नसल्याने तो उपायही करता येत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे आता 'धोंड्या धोंड्या पाणी दे' या आर्त हाकेलाही वरुणराजा साद द्यायला तयार नाही, अशीच स्थिती शहादा तालुक्यात आहे.

