भर पावसात काँग्रेसचे आंदोलन; NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका*

*भर पावसात काँग्रेसचे आंदोलन; NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका*

(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)

वर्धा - सतत सुरू असलेल्या पावसाची पर्वा न करता वर्धा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ NEET पेपरफुटी प्रकरण, शिक्षण व्यवस्थेतील कथित अनागोंदी, विद्यार्थी-युवकांवरील कथित अमानुष लाठीहल्ला तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना पाठविले.
   जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भर पावसातही आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
    निवेदनात शिक्षण व्यवस्थेतील वाढत्या कथित अनागोंदीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप करण्यात आला. NEET पेपरफुटी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. तसेच NEET परीक्षेतील कथित अनियमितता आणि व्यवस्थात्मक अपयशावर संसदेत तातडीने चर्चा करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.याशिवाय, नवी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान शांततापूर्ण निदर्शकांवर दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. निवेदनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अटकेचा निषेध नोंदविण्यात आला असून, केंद्र सरकारने लोकशाही मूल्यांचा आदर करून विद्यार्थी आणि विरोधी पक्षांवरील दडपशाही थांबवावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.
    विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकारने संवेदनशील भूमिका घेत तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.
या आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, प्रदेश सचिव अभ्यूदय मेघे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष अरुणाताई धोटे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ माउस्कर, सागर सबाने, निलेश तिजारे, रवींद्र भुजाडे, सुनील तळवेकर,बाबाराव पाटील,सुर्जीत चौधरी,सोनालीताई कोपूलवार, ऋतुजा भोयर, मनोज देशमुख, चंद्रशेखर घोडे, विलास कोरले, नगर परिषद गटनेते परवेज शेख, नगरसेवक रिंकू खान, मेहमूद शेख, सपना शेंडे, मनोज चौधरी, मनीषा मेघे, श्रीकांत बाराहाते यांच्यासह काँग्रेसचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post