तुकाराम मुंडेंचं महाराष्ट्रावर लक्ष पण स्वतःच्या बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष..– दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरूच– 1800 किलो व्हे पावडरचा साठा पोलीसांनी पकडला

तुकाराम मुंडेंचं महाराष्ट्रावर लक्ष पण स्वतःच्या बीड जिल्ह्याकडे दुर्लक्ष..

– दुधात भेसळ करण्याचा प्रकार सुरूच
– 1800 किलो व्हे पावडरचा साठा पोलीसांनी पकडला

(प्रशांत बाफना । बीड जिल्हा विभागीय संपादक)


दि.20 : बीडचे भुमीपूत्र तथा अन्न औषधी प्रशासनाचे आयुक्त आयएएस तुकाराम मुंडे यांच्या धडक कारवायांनी भेसळ माफीयांना धडकी भरवलेली आहे. त्यांनी पुणे-मुंबई सह इतर शहरात दुधात भेसळ करणार्‍यांवर कारवाया केल्या. मात्र अर्ध्याहून अधिक महाराष्ट्राला केमीकल युक्त दूध पुरवणार्‍या बीडच्या आष्टीत मात्र त्यांच्या पथकाने अद्याप एकही कारवाई केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्रात काय चाललेय याच्याशी देणंघेणं नसलेल्या आष्टीतील दूध माफीयांनी दुधातील भेसळ सुरूच ठेवल्याचं दिसत आहे. कारण आष्टी पोलीसांनी दुधात मिसळल्या जाणारं व्हे पावडरच्या 72 गोण्यामधील 1800 किलो पावडर जप्त केलं आहे. या प्रकरणी अहिल्यानगर व बीड जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.



18 ऑगस्ट रोजी आष्टी-जामगाव रोडवरील नक्षत्र लॉन्ससमोर दुधात भेसळ करण्यासाठी व्हे पावडरची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून संशयित पिकअप वाहन क्रमांक एमएच.13.सीयू.4141 अडवून तपासणी केली. वाहनात 25 किलो वजनाच्या 47 गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता, आष्टीतील एका ठिकाणी यापूर्वीच 25 गोण्या उतरविल्याची माहिती त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन पंचांसमक्ष पाहणी केली असता तेथे आणखी 25 गोण्या आढळून आल्या. या सर्व गोण्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारे एकूण 72 गोण्यांमधील 1 हजार 800 किलो व्हे पावडर पोलिसांच्या हाती लागली. या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकार्याच्या फिर्यादीवरून सुशांत उर्फ बाबू लक्ष्मण गोपाळघरे, हरिदास एकनाथ गोपाळघरे (दोघे रा. नागोबाची वाडी, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) आणि कैलास हंबर्डे (रा.आष्टी, जि.बीड) यांच्याविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिकअप चालक सुशांत उर्फ बाबू गोपाळघरे याला अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत.

चौकट-
मंचरला झालेली कारवाई काहीच नाही
आष्टीत त्यापेक्षाही मोठं रॅकेट कार्यरतपुण्याच्या मंचर येथे एफडीएच्या पथकाने धाड टाकून काही दिवसांपुर्वी मोठी कारवाई केली होती. या कारवाईत मोठ्या राजकीय नेत्यांशी संबंधीत कार्यकर्ते पकडले गेले होते. महाराष्ट्रातील दुध भेसळीत निम्म्याहून अधिक वाटा एकट्या आष्टी तालुक्याचा असू शकतो. संपूर्ण महाराष्ट्रातील दूध माफीये अंडरग्राऊंड झालेले असताना आष्टीत मात्र दुधात केमीकल मिसळून ते दूध डेअरी आणि इतरांना विकण्याचा धंदा अद्यापही सुरूच आहे. तुकाराम मुंडेंना आष्टीतील दुध माफीये अद्याप कसे काय दिसले नाहीत, असा सवाल उपस्थित होतोय
Previous Post Next Post