पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरण...! एसपी मुम्मका सुदर्शन...! दंडूके काढा आणि सराईत गुंडांना 'पोलीसी खाक्या' दाखवाच...!अहिल्यानगरमध्ये गुंडगिरी माजलीय का?अजूनही तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का नाही...?

पत्रकार सुशील थोरात हल्ला प्रकरण...! 

एसपी मुम्मका सुदर्शन...! दंडूके काढा आणि सराईत गुंडांना 'पोलीसी खाक्या' दाखवाच...!

अहिल्यानगरमध्ये गुंडगिरी माजलीय का?

अजूनही तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल का नाही...?



(स्पेशल रिपोर्ट
 प्रशांत बाफना विभागीय संपादक अहिल्यानगर)



लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारावर सराईत गुंडांकडून वर्दळीच्या ठिकाणी भ्याड हल्ला होणं, हे अहिल्यानगरच्या जिल्हा पोलीस यंत्रणेचा या शहरात अजिबात धाक उरलाच नाही, याचंच हे द्योतक आहे. यापूर्वी मुकुंदनगर भागात धीरज परदेशी या तरुणावर हल्ला करण्यात आला आणि दुर्दैवानं त्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. धीरज परदेशीच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच पाईपलाईन रोड या वर्दळीच्या भागात असलेल्या एका बँकेसमोर महेश मते, सोनू कुक, प्रशांत निक्रड आणि विकी ढवण या सराईत गुंडांसह १५ ते २० जणांनी पत्रकार सुशील थोरात यांच्यावर भ्याड हल्ला केला. विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर कित्येक तास उलटून गेले तरीही तोफखाना पोलीस ठाण्यात याप्रकरणी अद्यापपर्यंत संबंधित सराईत गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तोफखाना पोलीस हे पत्रकार थोरात यांच्या फिर्यादीची वाट पाहत आहेत.

प्रश्न असा आहे, की पत्रकार थोरात यांना वैद्यकीय उपचार मिळणं महत्त्वाचं की फिर्याद देणं महत्वाचं? अनेक प्रकरणात पोलीस स्वतः फिर्यादी होतात. मग याच प्रकरणात तोफखाना पोलीस स्वतः फिर्यादी का होत नाहीत? पत्रकार थोरात यांच्या फिर्यादीची वाट का पाहिली जात आहे? अहिल्यानगरमध्ये गुंडगिरी माजली आहे का? या गुंडांना अहिल्यानगर पोलिसांचा काहीच धाक वाटत नाही, हेच या हल्ल्याचे द्योतक आहे. अहिल्यानगरचे एसपी मुम्मका सुदर्शन यांना आम्ही या लेखामाध्यमातून आव्हान देऊ इच्छितो, की बस झाला आतापर्यंतचा 'सौजन्य सप्ताह'. आता दंडूके काढा आणि अशा सराईत गुंडांना एकदा 'पोलीसी खाक्या' दाखवाच.


खरं तर याप्रकरणी आतापर्यंत या सराईत गुंडाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येऊन या हल्ल्यात सहभागी असलेल्या सराईत गुंडांसह अनेकांच्या मुसक्या आवळण्यात यायला पाहिजे होत्या. परंतू याप्रकरणी पत्रकार थोरात यांच्याकडून फिर्याद आली नाही. ती आली, की लगेच गुन्हा दाखल करण्यात येईल आणि आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती अहिल्यानगर शहराचे डी वाय एस पी दिलीप टिपरसे यांनी ' मीडियाशी बोलताना दिली. सहाजिकच या हल्ल्यात पत्रकार थोरात हे जखमी झाल्यामुळे त्यांच्यावर प्रथमतः वैद्यकीय उपचार करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांच्याकडून पोलीस ठाण्यात आतापर्यंत फिर्याद देण्यात आलेली नाही. मात्र ही फिर्याद द्यायला आणखी उशीर झाला तर आरोपी अहिल्यानगर जिल्ह्याच्या बाहेर पसार होतील.  

पत्रकार सुशील थोरात यांच्यावर जो भ्याड हल्ला करण्यात आला, त्या हल्ल्याच्या पाठीमागे कारण असं फार काही गंभीर नाही, हे प्रथमदर्शनी दिसत आहे. या हल्लेखोरांकडून एका मुलाला कट मारण्यात आला. त्याचा जाब विचारल्याच्या रागातून पत्रकार थोरात यांच्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. एवढ्या छोट्याशा कारणावरुन जर सराईत गुंड पत्रकारांवर भ्याड हल्ला करायला लागले तर सर्वसामान्यांनी कोणाच्या भरवशावर जगायचं? अहिल्यानगर म्हणजे बिहार आहे का? या शहरात कायद्याचा आणि पोलिसांचा धाक अजिबात राहिला नाही का? दिनांक ६ जानेवारी या पत्रकारदिनाच्या दिवशी पत्रकारांनी अमुक करावं,  पत्रकारांनी तमुक करावं, पत्रकारांनी समाजाला दिशा द्यावी, असे उपदेशाचे डोस पाडले जातात. दुर्दैवानं प्राप्त परिस्थिती मात्र याउलट असल्याचं समोर येत आहे. 


पत्रकारांनी समाजाला दिशा द्यावी, ही अपेक्षा एक वेळ ठीक आहे. परंतू त्याच समाजातल्या सराईत गुंडांनी पत्रकारावर भर दिवसा भ्याड हल्ला करावा, हे कितपत संयुक्तिक आहे? पत्रकार सुशील थोरात यांच्यावर भ्याड हल्ला करणाऱ्या या सराईत गुंडांवर कारवाई होईल तेव्हा होईल. परंतू पोलीस आपलं काहीच वाकडं करु शकत नाही, असा या सराईत गुंडांचा भ्रम झाला असून या सराईत गुंडांच्या भ्रमाचा भोपळा अहिल्यानगर पोलीस कधी फोडणार आहेत? या अशा सराईत गुंडांची भरबाजारात धिंड काढण्याची हिंमत तोफखाना पोलीस दाखवणार आहेत का? अहिल्यानगर शहरामध्ये सामान्य नागरिक सोडा, पत्रकारसुद्धा सुरक्षित नाहीत, असा संदेश या घटनेमुळे दुर्दैवानं सर्वदूर पसरला आहे. या अशा सराईत गुंडांना पोलिसांचा धाक वाटेल, अशी भूमिका अहिल्यानगर पोलीस घेतील का, हेच आता पहायचं आहे.

पत्रकार सुशील थोरात यांच्यावर सराईत गुंडांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्यामागची कारण मिमांसा पोलीस तपासातून निष्पन्न होणार असली तरी याप्रकरणी अजून गुन्हाच दाखल करण्यात आलेला नाही. तर  मग या हल्ल्याप्रकरणी गुन्हा कधी दाखल होणार, आरोपींना अटक कधी केली जाणार आणि या हल्ल्यामागचं कारण कधी समोर येणार? याआधीही अशा हल्ल्याच्या अनेक घटना अहिल्यानगर शहरात घडलेल्या आहेत. मात्र हल्लेखोरांवर जरब बसेल, अशी कारवाई दुर्दैवानं आतापर्यंत करण्यात आलेली नाही. खमक्या स्वभावाचा पोलीस अधिकारी जर या अहिल्यानगर शहराला मिळाला तरच हे शक्य आहे.

जाता जाता एसपी मुम्मका सुदर्शन यांना एवढंच सांगायचं आहे, की अशा सराईत गुंडांवर पोलिसांची जरब बसवायची असेल तर तुम्हाला रस्त्यावर उतरुन कारवाई करावी लागेल. विश्वास नांगरे, कृष्णप्रकाश, सुनील रामानंद या पोलीस अधिकाऱ्यांनी असं करुनच या ऐतिहासिक शहरात पोलीस दलाचा उग्रावतार दाखवलेला आहे. तुमच्याकडूनदेखील अहिल्यानगरकरांची हीच अपेक्षा आहे. अवैध धंद्यांवर जशी कारवाई तुम्ही केली, तशी आता या सराईत गुंडांवर तुमचं दांडकं पडू द्या. त्यानंतर तुमच्या लक्षात येईल, की या अशा सराईत गुंडांना नक्कीच पळता भुई थोडी होईल. अन्यथा निष्क्रिय पोलीस दलाचा सेनापती म्हणून तुमची ओळख व्हायला वेळ लागणार नाही. तूर्तास इतकंच
Previous Post Next Post