पैसे न दिल्यास ॲट्रॉसिटीचा गुन्ह्यात अडकविण्याची धमकी;
ग्राममहसूल अधिकाऱ्याला मागितली 5 हजारांची खंडणी; चौघांवर गुन्हा
(अहिल्यानगर विभागीय संपादक। प्रशांत बाफना)
तालुक्यातील नान्नज येथे ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे दरमहा पाच हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करून धमकावणे, कोयता दाखविणे, शासकीय कागदपत्रे ओढून फेकणे आणि धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी महादेव अरुण साठे, विशाल साठे, अलोक राजू साठे आणि आकाश राजू साठे यांच्याविरुद्ध जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्राम महसूल अधिकारी प्रीतम खाडे हे सन 2023 पासून नान्नज येथे कार्यरत आहेत. 19 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास खाडे हे कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी वरील चौघे कार्यालयात आले. नान्नज येथे काम करायचे असेल तर दरमहा पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करून धमकावल्याचा आरोप आहे. माहिती अधिकाराचे अर्ज देऊ तसेच खोटा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
याचवेळी महादेव साठे याने नारळ तोडण्याचा कोयता दाखवून पैसे देण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे घाबरून पाच हजार रुपये दिल्याचे फिर्यादीने सांगितले आहे.यानंतर आरोपींनी कार्यालयातील शासकीय कागदपत्रे ओढून घेऊन फेकून दिली. धक्काबुक्की करून काम करण्यापासून परावृत्त केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी 21 ऑगस्ट रोजी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (इछड) 2023 मधील कलम 132, 308(6), 308(7), 352 व 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 1959 मधील कलम 4 व 25 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास जामखेड पोलिस करीत आहेत

