बंद पथदिव्यांचा ‘सन्मान’; मिरी रोडवर अनोखे आंदोलन..रांगोळी काढून व हार घालून पथदिव्यांचा केला सत्कार; नागरिकांची मोठी गर्दी

बंद पथदिव्यांचा ‘सन्मान’; मिरी रोडवर अनोखे आंदोलन

रांगोळी काढून व हार घालून पथदिव्यांचा केला सत्कार; नागरिकांची मोठी गर्दी

(अहिल्यानगर/विभागीय संपादक प्रशांत बाफना)

शेवगाव नगरपरिषद हद्दीतील मिरी रोडवरील न्यू आर्ट कॉलेज ते कर्डिले वस्ती रोड या मुख्य मार्गावर नव्याने बसविण्यात आलेले बहुतांश पथदिवे बंद असल्याच्या निषेधार्थ आज सकाळी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रेय फुंदे, बाळासाहेब फटांगडे आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते प्रशांत घुमरे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बंद पथदिव्यांसमोर रांगोळी काढून तसेच पथदिव्यांना हार घालून त्यांचा ‘सन्मान’ केला.

या अनोख्या आंदोलनाची माहिती मिळताच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी मोठी गर्दी केली. बंद असलेल्या पथदिव्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी उपरोधिक पद्धतीने पथदिव्यांचा सत्कार केला.

मिरी रोडवरील न्यू आर्ट कॉलेज ते कर्डिले वस्ती रोड हा महत्त्वाचा मुख्य मार्ग असून या मार्गावर नगरपरिषदेमार्फत नवीन पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, नवीन पथदिवे बसविल्यानंतरही ते बहुतांश वेळा बंद राहत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावर अंधार असल्याने नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

सहा जीपीएस छायाचित्रांचे पुरावे

आरटीआय कार्यकर्ते प्रशांत घुमरे यांनी या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनालयाकडे तक्रार दाखल केली आहे. जून २०२६ पासून वेगवेगळ्या तारखांना काढलेले पथदिवे बंद असल्याचे सहा जीपीएस लोकेशनसह छायाचित्रात्मक पुरावे उपलब्ध असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. संबंधित छायाचित्रांमध्ये दिनांक, वेळ आणि जीपीएस लोकेशनची माहिती असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

आरटीआय अर्ज व प्रथम अपील

पथदिवे बसविण्याचा खर्च, मंजूर अंदाजपत्रक, निविदा प्रक्रिया, संबंधित ठेकेदार, वापरण्यात आलेले साहित्य, कामाची गुणवत्ता, मोजमाप पुस्तिका, बिले तसेच देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी याबाबत माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत अर्ज करण्यात आला आहे. माहिती उपलब्ध न झाल्याने १० ऑगस्ट २०२६ रोजी प्रथम अपीलही दाखल करण्यात आले आहे.

मात्र, माहितीचा अधिकार अर्ज व प्रथम अपीलाची प्रक्रिया स्वतंत्र असून नागरिकांना सार्वजनिक रस्त्यावर प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे ही नगरपरिषदेची स्वतंत्र जबाबदारी आहे. त्यामुळे आरटीआय प्रक्रियेचा निकाल लागेपर्यंत पथदिव्यांची समस्या प्रलंबित ठेवू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.

तांत्रिक तपासणी करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी

संपूर्ण मार्गावरील पथदिव्यांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी व तांत्रिक तपासणी करावी, बंद पथदिवे त्वरित सुरू करावेत, विद्युत जोडणी, वायरिंग, पोल, एलईडी दिवे, नियंत्रण पॅनेल व टायमरची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठेकेदार, संस्था आणि देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी आहे.

आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या

- मिरी रोडवरील सर्व पथदिव्यांची तातडीने पाहणी करावी.
- बंद असलेले पथदिवे त्वरित कार्यान्वित करावेत.
- पथदिवे बंद राहण्यामागील तांत्रिक व प्रशासकीय कारणांची चौकशी करावी.
- पथदिव्यांच्या कामाची गुणवत्ता व वापरलेल्या साहित्याची तपासणी करावी.
- संबंधित ठेकेदार व जबाबदार यंत्रणेची जबाबदारी निश्चित करावी.
- नियमित देखभालीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
- तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीचा लेखी अहवाल उपलब्ध करून द्यावा.

बंद पथदिव्यांना हार घालून व त्यांच्यासमोर रांगोळी काढून केलेल्या या अनोख्या आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. आता तरी नगरपरिषद प्रशासनाने या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन पथदिवे सुरू करावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली
Previous Post Next Post