वस्तीच्या परिसरात मद्यविक्रीच्या दुकानाला विरोध
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
(विदर्भ मराठवाडा संपादक अब्दुलकदीर जेष्ठ पत्रकार वर्धा जिल्हा)
विलास केजरकर भंडारा
भंडारा:- प्रगती कॉलनी आणि सुयोग नगर, स्टेशन रोड येथील नागरिकांनी सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील दुकान क्रमांक ३ मध्ये प्रस्तावित बिअर व वाईन शॉपीला विरोध करीत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सावन कुमार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. नागरिकांनी सदर दुकानाला देण्यात येणारी परवानगी रद्द करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले की, प्रस्तावित दुकान पूर्णपणे निवासी परिसरात असून येथे महिला, लहान मुले, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांची दिवसभर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. दुकाना लगतच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे दुकान असून तेथे महिला आणि कुटुंबांची नियमित ये-जा करत असतात. प्रस्तावित ठिकाणापासून सुमारे ६० ते ७० फूट अंतरावर मंदिर आहे.
मद्य विक्रीचे दुकान सुरू झाल्यास गर्दी, वादविवाद, वाहतुकीची कोंडी, महिलांना त्रास तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली. दुकानाच्या समोर मागील ८ वर्षांपासून संतकृपा सभागृह अँड लॉन सुरू आहे. येथे होणाऱ्या समारंभांना येणारे नागरिक सदर दुकानातून मद्य खरेदी करून परिसरातच मद्यसेवन केल्यास गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
सिल्वर स्प्रिंग अपार्टमेंटमधील दुकानांच्या नोंदणीकृत विक्री दस्तऐवजात मद्य, बिअर व वाईन विक्रीचा व्यवसाय करण्यास प्रतिबंध असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे दस्तऐवजाची सखोल तपासणी करून परवानगी देऊ नये अशी मागणी करण्यात आली. निवेदनावर ५० हून अधिक नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्या.
यावेळी ॲंड. राजकुमार वाडीभस्मे, रमेश नागपूरे, खुशाल आकरे, सुरेश मोहबंसी, राजू जगनाडे, ए. के. मेहर, रामकृष्णा गिरीपुंजे, राजकुमार गभने, रमेश बनकर उपस्थित होते.

