रावेर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न
MPSC परीक्षेत यश; सहाय्यक आयुक्त पदावर निवड झाल्याबद्दल सहकाऱ्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
(कार्यकारी संपादक जाकीर तडवी रावेर)
रावेर : रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) सहाय्यक आयुक्त विक्रीकर पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ उत्साहात पार पडला.
पुरवठा निरीक्षक म्हणून कार्यरत असताना कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांनी आपल्या कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, कार्यतत्परता आणि नागरिकांशी असलेला आपुलकीचा संवाद यामुळे सहकाऱ्यांमध्ये तसेच नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या MPSC मधील यशाबद्दल रावेर तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील प्रशासकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रभारी तहसीलदार श्री. संजय तायडे साहेब , नायब तहसीलदार श्री आर .डी.पाटील साहेब उपस्थित होते तसेच मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना मेहनत, चिकाटी आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर प्रशासकीय सेवेत मिळविलेले हे यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सरोदे यांनीही आपल्या सेवाकाळातील आठवणींना उजाळा देत सर्व अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले.
समारंभाच्या शेवटी कु. डाळिंबी रवींद्र सरोदे यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील प्रशासकीय वाटचालीसाठी उपस्थितांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

