शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी-आ. राजेश पवार

शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी-आ. राजेश पवार

(धर्माबाद तालुका प्रतिनिधी सज्जन संतोष)

पावसाने दडी मारल्याने नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव, धर्माबाद आणि उमरी तालुक्यांतील खरीप पिके करपून वाळत आहेत.परिस्थितीची दखल घेत आ. राजेश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांनी मशागत, बियाणे, खते, औषधे व मजुरीवर मोठा खर्च केला; मात्र पावसाअभावी हातातोंडाशी आलेले पीक वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची तलाठी, मंडळ अधिकारी आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी करून नुकसानीची नोंद करण्याची मागणीही त्यांनी केली. दरम्यान, किती गावांमध्ये नुकसान झाले, किती हेक्टर क्षेत्र बाधित आहे, पंचनामे कधी सुरू होणार आणि मदतीसाठी प्रशासनाची कार्यवाही काय आहे, याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागविण्यात आली आहे. शेतकरी संकटात असताना शासनाच्या माध्यमातून त्यांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आ. राजेश पवार यांनी स्पष्ट केले.
Previous Post Next Post