*अवैध गौण खनिज वाहतुकीचा पर्दाफाश; महसूल पथकाने ट्रॅक्टर घेतला ताब्यात*

*अवैध गौण खनिज वाहतुकीचा पर्दाफाश; महसूल पथकाने ट्रॅक्टर घेतला ताब्यात* 

(जळगाव जिल्हा प्रतिनिधी जितु इंगळे रावेर)

 स्थानिक सुखी नदी पात्रातून अवैध गौण खनिज (वाळू/रेती) वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या पथकाने धडक कारवाई केली आहे. ही कारवाई मा. तहसीलदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, सुखी नदी पात्रातून बेकायदेशीरपणे गौण खनिजाची चोरी आणि वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे महसूल पथकाने सकाळी ११:०० वाजताच्या सुमारास ऊटखेडा-कुंभारखेडा रस्त्यावर सापळा रचून धाड टाकली.या मोहिमेदरम्यान संशयास्पद वाटणारा एक ट्रॅक्टर (क्रमांक MH 30 BL 1594) थांबवून त्याची कसून तपासणी करण्यात आली. या ट्रॅक्टरचा चालक निशांत वसंत इंगळे याच्याकडे वाळू वाहतुकीशी संबंधित कोणताही वैध परवाना किंवा रॉयल्टी पावती आढळून आली नाही.परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर, संबंधित वाहनावर गौण खनिज कायद्यातील नियमांनुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

             पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी सदर ट्रॅक्टर तहसील कार्यालय परिसरात जमा करण्यात आला आहे."अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर प्रशासनाची कडक नजर असून, यापुढील काळातही अशा अवैध प्रकारांवर आणखी कठोर कारवाई सुरूच राहील," असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
Previous Post Next Post