बिलोली तालुक्यात महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात नागरिक आक्रमक; सगरोळी उपकेंद्रावर बैठक
मारोती एडकेवार
जिल्हा प्रतिनिधी नांदेड
नांदेड : बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील महावितरणच्या 33 केव्ही उपकेंद्रावर आज सकाळी 11 वाजता इमर्जन्सी लोड शेडिंग बंद करावी या मागणीसाठी सगरोळी सर्कलमधील नागरिकांनी बैठक घेत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
सगरोळी सर्कलमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अघोषित व इमर्जन्सी लोड शेडिंग सुरू असून, काही गावांमध्ये तर दिवसेंदिवस लाईटच नसल्याचा आरोप नागरिकांनी केला. या पार्श्वभूमीवर ही तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला महावितरणचे सगरोळी सर्कलचे कनिष्ठ अभियंता (JE), उपअभियंता (DY), चाटे सर उपस्थित होते.
तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर म्हणून माजी जि.प. सदस्य गणेश पाटील, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष व सगरोळीचे ग्रा.पं. सदस्य शंकर महाजन, बोळेगावचे प्रशासक सरपंच विठ्ठल तुकडेकर, बोळेगावचे माजी सरपंच प्रतिनिधी विश्वनाथ बोधनापोड, येसगीचे प्रशासक सरपंच सदाम पटेल, महाराष्ट्र संकल्प चे पत्रकार राजेश आंबेडकर,देशोन्नतीचे पत्रकार मुंगडे सर, हिप्परगा थडी येथील नागरिक उपस्थित होते.
बैठकीत नागरिकांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या
बोळेगावचे प्रशासक सरपंच विठ्ठल तुकडेकर यांनी गावातील समस्या मांडताना सांगितले की, बोळेगाव येथील 25 KVA क्षमतेच्या ट्रान्सफार्मरच्या सात वेळा बुड्या (बुशिंग) उडाल्या असून, केबल वारंवार जळत आहे. त्यामुळे गावाचा वीज पुरवठा खंडित होत आहे.
- अनेक गावांमध्ये महिनोंमहिने वीज बिले जास्त येत आहेत.
- गावातील जुने व झुकलेले वीज पोल तात्काळ काढून नवीन पोल बसवावेत-.येणाऱ्या गणेश उत्सव आणि दुर्गामाता उत्सव काळात कोणतेही लोड शेडिंग करू नये.
यावेळी सगरोळी, बोळेगाव, येसगीसह सर्कलमधील सात ते आठ गावांतील नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
या बैठकीला सगरोळी सर्कलमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरात लवकर या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.

