अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला २५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती.पोलिसांवरील मनुष्यबळाचा ताण, सण-उत्सवांची पार्श्वभूमी अन् डीमार्केशनचा मुद्दा ; यावल नगरपरिषदेचा निर्णय.

अतिक्रमण काढण्याच्या कारवाईला २५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती.

पोलिसांवरील मनुष्यबळाचा ताण, सण-उत्सवांची पार्श्वभूमी अन् डीमार्केशनचा मुद्दा ; यावल नगरपरिषदेचा निर्णय.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)


यावल दि. ८ 
 — यावल शहरातील अतिक्रमणधारकांवर ८ सप्टेंबर २०२६ पासून प्रस्तावित करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईला अखेर २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. आगामी सण-उत्सवांची पार्श्वभूमी, यावल पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असलेले मर्यादित मनुष्यबळ, पोलिसांवरील शासकीय कामाचा ताण तसेच संबंधित ठिकाणी अद्याप स्पष्टपणे डीमार्केशन (सीमा आखणी) न झाल्याने ही कारवाई तूर्त स्थगित ठेवण्यात आल्याची माहिती नगरपरिषदेच्या अध्यक्षा सौ. छायाताई अतुल पाटील यांच्या वतीने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंतराव पाटील यांनी अतिक्रमणधारक व उपस्थित पत्रकारांना दिली.

अतिक्रमणधारकांशी संवाद साधताना अतुल पाटील यांनी सांगितले की,अतिक्रमण हटाव कारवाईबाबत नगरपरिषदेने सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग,महसूल विभाग तसेच पोलीस प्रशासनाशी चर्चा केली आहे. मात्र,कारवाईपूर्वी संबंधित ठिकाणी आवश्यक डीमार्केशन व सीमा निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणे महत्त्वाचे आहे.त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडे मनुष्यबळाची कमतरता असून, पोलिसांवर विविध शासकीय कामांचा अतिरिक्त ताण आहे.या बाबींचा विचार करून कारवाईला २५ सप्टेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘स्थगिती म्हणजे कारवाई रद्द नव्हे’

दरम्यान,अतिक्रमणधारकांनी या स्थगितीचा अर्थ अतिक्रमण कायम ठेवण्याची परवानगी असा घेऊ नये,असेही स्पष्ट करण्यात आले.राष्ट्रीय महामार्ग विभागामार्फत महामार्गाचे काम सुरू असल्याने भविष्यात संबंधित जागेवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी आवश्यक ती मानसिक तयारी ठेवावी,असे आवाहन करण्यात आले.

डीमार्केशनशिवाय कारवाई सुरू करण्यावर प्रश्नचिन्ह

यावल शहरात अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत नगरपरिषदेने जाहीर सूचना दिल्यानंतर अतिक्रमणधारकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. कोणत्या ठिकाणी किती जागा अतिक्रमणाच्या कक्षेत येते, याबाबत प्रत्यक्ष सीमा आखणी म्हणजेच डीमार्केशन स्पष्ट झाल्यानंतरच कारवाई करावी, अशी भूमिका नागरिकांकडून मांडली जात होती.

याशिवाय आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अचानक मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविल्यास नागरिक,व्यापारी आणि अतिक्रमणधारकांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

पोलिसांवरील ताणाचे कारण पुढे

अतिक्रमण हटावासाठी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता असते. मात्र, यावल पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध मनुष्यबळ आणि त्यांच्यावर असलेल्या विविध शासकीय जबाबदाऱ्या लक्षात घेता अतिक्रमण कारवाई पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे अतिक्रमणाचा प्रश्न सोडविताना प्रशासनाने पोलीस यंत्रणेवरील ताणाचाही विचार केल्याचे दिसून येत आहे.

मात्र,या निर्णयामुळे शहरात विविध चर्चा सुरू झाल्या असून, अतिक्रमण कारवाईला स्थगिती देण्यामागे नागरिकांच्या भावना, आगामी सण-उत्सव, डीमार्केशनचा अभाव आणि पोलीस प्रशासनावरील कामाचा ताण या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

२५ सप्टेंबरनंतर काय ?

आता २५ सप्टेंबरनंतर अतिक्रमण हटाव कारवाईबाबत नगरपरिषद कोणती भूमिका घेते,याकडे यावल शहराचे लक्ष लागले आहे.त्यापूर्वी संबंधित विभागांनी संयुक्त पाहणी करून डीमार्केशन स्पष्ट करावे, पात्र-अतिक्रमणग्रस्तांची वस्तुनिष्ठ माहिती निश्चित करावी आणि नियमानुसार पुढील कारवाई करावी,अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान,अतिक्रमणधारकांनीही प्रशासनाच्या निर्णयाचा आदर करत कायदेशीर प्रक्रिया आणि पुढील निर्णयाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Previous Post Next Post