गणेशोत्सवात ‘डीजे बंद’चा पोलिसांचा निर्धार; डीजे वाजवल्यास मंडळासह चालकावर गुन्हा; डीजे जप्त करण्याचा इशारा
(अहिल्यानगर / प्रशांत बाफना
विभागीय संपादक )
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात साजरा करताना डीजेचा वापर पूर्णपणे टाळावा, असे आवाहन तालुका पोलीस निरीक्षक गणेश वारुळे यांनी केले. डीजे वाजवल्यास संबंधित गणेश मंडळ आणि डीजे चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल तसेच डीजे जप्त केला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
गणेशोत्सवात पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना प्राधान्य देण्याचे आवाहन पोलिसांनी केले. गावागावात भजन, कीर्तन, व्याख्याने, विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून गणेशोत्सव अधिक विधायक पद्धतीने साजरा करावा, असे वारुळे यांनी सांगितले.
नगर तालुक्यात ६९ गावे असून, प्रत्येक गावातील ग्रामस्थ, गणेश मंडळे, पदाधिकारी, ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी परस्पर सहकार्य करणे गरजेचे आहे. ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यासाठी मंडळांनी पुढाकार घ्यावा. ही संकल्पना प्रभावीपणे राबविणाऱ्या गावांना बक्षीस देण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
गावातील डीजे बंद करण्यासाठी सरपंचांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करताना वारुळे म्हणाले की, डीजेमुळे होणाऱ्या मोठ्या आवाजाचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच विद्यार्थ्यांवर होतो. ध्वनी प्रदूषणामुळे आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात ध्वनी प्रदूषण टाळणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.
गावात नियमांचे उल्लंघन करून डीजे वाजविला जात असल्यास नागरिकांनी तत्काळ नगर तालुका पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव आनंदात, शांततेत आणि सामाजिक सलोखा कायम ठेवत साजरा करण्याचे आवाहन पोलिसांनी केले

