चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला ..दुष्काळाचे सावट सर्जा-राजाच्या सणावर..बैलपोळ्याच्या खरेदीत ७० टक्के घट..बळीराजाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट..

चारा-पाण्याची टंचाई अन् खिशाला महागाईचा फटका; अहिल्यानगरमध्ये बैलपोळ्याचा बाजार थंडावला ..

दुष्काळाचे सावट सर्जा-राजाच्या सणावर..

बैलपोळ्याच्या खरेदीत ७० टक्के घट..

बळीराजाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट..

 

(प्रशांत बाफना/,​अहिल्यानगर विभागीय संपादक )


: अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. पाण्याची कमतरता आणि जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने शेतीबरोबरच पशुधन जगवण्याचे आव्हान बळीराजासमोर उभे ठाकले आहे. या परिस्थितीचा परिणाम आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत जिव्हाळ्याच्या असलेल्या बैलपोळा सणावरही दिसू लागला आहे.

बैलपोळ्याच्या बाजारात शुकशुकाट

बैलपोळा अवघ्या दोन दिवसांवर आला असतानाही बाजारपेठांमध्ये दरवर्षीसारखी गर्दी आणि उत्साह दिसत नाही. बैलांच्या शिंगांना रंगवण्यासाठी रंग, गोंडे, घुंगरमाळा, झूल, बाशिंग, मोरक्या आणि इतर सजावटीच्या वस्तूंची दुकाने सजली आहेत. मात्र ग्राहकांची संख्या घटल्याने व्यापाऱ्यांना विक्रीची प्रतीक्षा करावी लागत आहे.



३-४ हजारांचा खर्च थेट ५०० रुपयांवर

गेल्या वर्षी बैलांच्या सजावटीसाठी ३ ते ४ हजार रुपयांपर्यंत खर्च करणारे शेतकरी यंदा अवघ्या ५०० रुपयांपर्यंतच खरेदी करत असल्याचे चित्र आहे. आधीच शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याबाबत चिंता असताना जनावरांच्या चारा-पाण्यासाठी होणारा खर्च आणि वाढती महागाई यामुळे शेतकऱ्यांनी सणाचा खर्च कमी केला आहे.

खरेदीत तब्बल ७० टक्क्यांची घट

यंदा पोळ्याच्या साहित्याच्या खरेदीत सुमारे ७० टक्क्यांपर्यंत घट झाल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. सण जवळ आला तरी अपेक्षित विक्री होत नसल्याने मोठ्या प्रमाणात सजावटीचे साहित्य दुकानांमध्ये पडून आहे. त्यामुळे दुष्काळाचा फटका केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे.

सर्जा-राजाचा सण यंदा साधेपणाने

बैलपोळ्याला शेतकरी वर्षभर शेतीत साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात. बैलांना अंघोळ घालून, शिंगे रंगवून आणि आकर्षक सजावट करून त्यांची पूजा केली जाते. मात्र यंदाच्या आर्थिक परिस्थितीमुळे अनेक शेतकरी उपलब्ध असलेल्या जुन्याच सजावटीच्या साहित्याचा वापर करून किंवा अत्यंत मोजकी खरेदी करून पोळा साजरा करण्याच्या तयारीत आहेत.

शेतकऱ्यांबरोबर व्यापारीही संकटात

पोळ्याच्या काळात होणारी उलाढाल स्थानिक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची असते. त्यामुळे खरेदीत झालेली मोठी घट त्यांच्यासाठीही आर्थिक धक्का ठरत आहे. लाखो रुपयांचे साहित्य विक्रीअभावी पडून असल्याने यंदाचा पोळा शेतकरी आणि व्यापारी अशा दोघांसाठीही आर्थिक चिंतेचा ठरत असल्याचे चित्र अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहे
Previous Post Next Post