यावलमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह; कारवाई सर्व भागात समान करण्याची अतिक्रमणधारकांची मागणी.

यावलमध्ये अतिक्रमण हटाव मोहिमेवर प्रश्नचिन्ह; कारवाई सर्व भागात समान करण्याची अतिक्रमणधारकांची मागणी.

(महाराष्ट्र राज्य सहसंपादक सुरेश पाटील यावल)

यावल दि.६
 यावल नगरपरिषदेने शहरातील सार्वजनिक वापराच्या जागांवरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविण्याबाबत दिलेल्या नोटिशीमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. नगरपरिषदेने चोपडा–फैजपूर रोड तसेच बुरुज परिसरातून सातोद गावाकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. 
मात्र, अतिक्रमण हटावाची कारवाई केवळ ठराविक भागापुरती मर्यादित न ठेवता संपूर्ण शहरात समान पद्धतीने करण्यात यावी, अशी मागणी अतिक्रमण धारकांकडून होत आहे.
अतिक्रमणधारकांचे म्हणणे आहे की, शहरातील विविध भागांमध्ये सार्वजनिक जागांवर अतिक्रमणे असल्याची चर्चा असताना केवळ दोन प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणांवरच कारवाई का केली जात आहे ? हा प्रश्न निर्माण झाला आहे. जर अतिक्रमणे हटविणे आवश्यक असेल तर कोणताही भेदभाव न करता शहरातील सर्व भागांचे सर्वेक्षण करून समान निकषांवर कारवाई करावी,अशी भूमिका नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

दरम्यान, नगरपरिषदेने दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी नोटीस प्रसिद्ध करून ७ सप्टेंबर पासून कारवाई करण्याचे सूचित केले आहे.त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांना पुरेसा वेळ मिळाला आहे का, तसेच कारवाईपूर्वी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे का? याबाबतही चर्चा सुरू झाली आहे. अतिक्रमणधारकांना आपली बाजू मांडण्यासाठी आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची योग्य संधी देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
यावल शहरात विविध समाजघटक गुण्यागोविंदाने राहत असून आगामी धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शहरातील शांतता, सामाजिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहणे महत्त्वाचे आहे.
त्यामुळे अतिक्रमण हटावाची कारवाई करताना प्रशासनाने पारदर्शकता,समानता आणि कायदेशीर प्रक्रिया यांना प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

अतिक्रमणधारकांच्या मते, प्रशासनाने प्रथम शहरातील सर्व अतिक्रमणांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून त्यांची यादी जाहीर करावी. त्यानंतर सर्वांना समान नियम लागू करून टप्प्याटप्प्याने कारवाई केल्यास प्रशासनावरील नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो.

“कारवाईला आमचा विरोध नाही; मात्र कारवाई सर्वांसाठी समान असावी. ठराविक भागातीलच अतिक्रमणे हटविण्याऐवजी संपूर्ण शहरात एकसमान निकष लागू करावेत आणि संबंधितांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी,” अशी भूमिका अतिक्रमणधारकांकडून व्यक्त होत आहे.
येत्या काळात नगरपरिषद प्रशासन,लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे यावलकरांचे लक्ष लागले आहे.


यावल नगरपरिषदेची भेदभावाची वागणूक?

ठराविक दोनच भागांतील अतिक्रमणांवर कारवाईचा घाट ; संपूर्ण शहरातील अतिक्रमणांवर समान कारवाई का नाही?
यावल नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवरून शहरात संतापाची चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण शहरात अतिक्रमणे असताना केवळ ठराविक दोन भागांतील अतिक्रमणांवरच कारवाई का, असा सवाल अतिक्रमणधारकांचा आहे.
नगरपरिषदेची ही कारवाई भेदभावपूर्ण आहे का ? असा थेट प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अतिक्रमण हटवायचेच असेल तर शहरातील सर्व भागांतील अतिक्रमणांवर समान निकषाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.

अन्यथा केवळ निवडक भागांना लक्ष्य केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण होण्याची शक्यता आहे.कारवाईपूर्वी संबंधितांना पुरेसा वेळ व कायदेशीर बाजू मांडण्याची संधी द्यावी,अशीही मागणी आहे.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने भेदभावाचा आभास निर्माण होणार नाही,याची दक्षता घेऊन पारदर्शक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Previous Post Next Post